रुग्णालयावरील हल्लाप्रकरणी चार जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:51 AM2017-11-30T06:51:16+5:302017-11-30T06:51:32+5:30

उपचारादरम्यान रोहित भोईर या तरूणाच्या झालेल्या मृत्युनंतर होलीक्रॉस रूग्णालयाची झालेली तोडफोड आणि पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी चार जणांना पोलिसांनी बुधवारी अटक केली.

 Four people are accused in the attack on the hospital | रुग्णालयावरील हल्लाप्रकरणी चार जण अटकेत

रुग्णालयावरील हल्लाप्रकरणी चार जण अटकेत

Next

कल्याण : उपचारादरम्यान रोहित भोईर या तरूणाच्या झालेल्या मृत्युनंतर होलीक्रॉस रूग्णालयाची झालेली तोडफोड आणि पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी चार जणांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर हल्लेखोरांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला.
दरम्यान, मृत तरूणाचे वडील रमेश भोईर यांनी या हल्ल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली असून पत्रक काढून रूग्णालयाच्या तोडफोडीशी आमचा आणि आमच्या नातेवाईकांचा संबंध नसल्याचा दावा केला आहे.
रूग्णालय तोडफोड आणि पत्रकारावरील हल्लाप्रकरणी आंदोलनकर्त्या जमावावर एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेटावदकर यांच्यावर सशस्त्र हल्ला करणाºयांवर पोलिसांनी प्रांरभी भादंविच्या कलम ३२६ (गंभीर जखम करणे) नुसार गुन्हा दाखल केला आणि कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) हे कलम लावणे खुबीने टाळले होते. याप्रकरणी पत्रकारांकडून विचारणा झाल्यानंतर, आग्रह धरल्यानंतर अखेर ३०७ कलमाचा समावेश करण्यात आला.
या तोडफोडीला राजकीय रंग लागल्याचे बोलले जात असताना या प्रकरणातील हल्लेखोरांना अटक करण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. योगेश किसन भोईर, महेश लक्ष्मण भोईर, अनमोल बबन भोईर, हरेष गुरूनाथ पाटील अशी त्यांची नावे आहेत. ते २२ ते २९ वयोगटातील असून वरप, म्हारळ आणि सापर्डे येथील रहिवासी आहेत. त्यांना बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
मृत तरूणाच्या नातलगांनी तोडफोड आणि हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केल्याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्या दाव्याचा इन्कार केला. आम्ही केलेला तपास आणि योग्य चौकशी करूनच आरोपींना अटक केल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व डॉक्टरांचे कामबंद : होलीक्रॉस रूग्णालयातील तोडफोड ही पोलिसांच्या हलगर्जीमुळे झाल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. सर्व आरोपींना सोमवार, ४ डिसेंबरपर्यंत अटक न झाल्यास मंगळवारपासून कल्याण-डोंबिवलीतील मधील सर्व रु ग्णालये बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला.

रूग्णालयाची तोडफोड आणि डॉक्टर, कर्मचाºयांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधासाठी विनायक हॉलमध्ये झालेल्या सभेत हा इशारा देण्यात आला. यावेळी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदरमधील शेकडो डॉक्टर उपस्थित होते.

मृत रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णालयाची नासधूस केली, तेव्हा पोलीस तेथे उपस्थित होते. त्यांच्यासमोर ही घटना घडल्याने पोलीस याला जबाबदार असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला. हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, हल्लेखोरांवर मेडिकेयर अ‍ॅक्ट २०१० अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणीही

कठोर कारवाई करण्यास निवेदन
ठाणे : कल्याणला पत्रकारावर झालेल्या खुनी हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन ठाणे जिल्हा पत्रकार संघ तसेच ठाणे शहर पत्रकार संघाने बुधवारी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना दिले. आयुक्तांनी यावेळी कडक कारवाईचे आश्वासन दिले.

‘आमचा संबंध नाही’
रोहित भोईर या मृत तरूणाचे वडील रमेश बळीराम भोईर यांनी रूग्णालयात घडलेल्या तोडफोड प्रकरणाशी आमचा आणि नातेवाईकांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. आम्ही कोणताही अनुचित प्रकार केलेला नाही.
ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा आम्ही एमएफसी पोलीस ठाण्यात होलीक्रॉस रूग्णालयातील डॉक्टरांविरूध्द तक्रार करण्यासाठी हजर होतो. हा प्रकार अन्य कोणीतरी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जखमी पत्रकाराबद्दल मला खेद आहे.
मारहाणीचा निषेध करून दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. रोहितचे डोके दुखत असल्याने त्याला रविवारी होलीक्रॉस रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रूग्णालयातील डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे रोहितचा मृत्यू झाल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला आहे.
रोहितचा मृत्यू झाल्याची माहीती आम्हाला डॉक्टरांनी दिली नाही. पोलीस रूग्णालयात दाखल झाल्यावर त्यांच्याकडून रोहितचा मृत्यू झाल्याचे समजले, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title:  Four people are accused in the attack on the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.