मॅजिक पेनने गंडा घालणारे चौघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:54 AM2018-08-19T03:54:08+5:302018-08-19T03:54:34+5:30
ठाणे पोलिसांची कामगिरी; आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन
ठाणे : कर्ज मिळवून देतो, असे सांगून घेतलेल्या रद्द धनादेशांवर मॅजिक पेन आणि बोगस पॅनकार्डद्वारे बँकेतून रक्कम काढणाऱ्या एका चौकडीला ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.
हा गुन्हा बोगस पॅनकार्डमुळे उघडकीस आला असून या चौकडीकडून विविध मोबाइल कंपन्यांची २१ सीमकार्ड, १५ जणांचे बेअरर चेक, बँकेची बनावट ओळखपत्रे, दोन बोगस पॅनकार्ड आणि चार जणांच्या कर्ज प्रकरणांची कागदपत्रे आदींसह फसवणूक केलेली ४० हजारांची रोकडही हस्तगत केली आहे. तसेच त्यांनी ठाणे, मुंबईतही फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांना ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अशा प्रकारे आमिष दाखवणाºया भामट्यांच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये, किंबहुना कुणाची फसवणूक झाली असल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यांत तक्र ार दाखल करावी, असे आवाहन उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
मुख्य सूत्रधार प्रसन्ना सावंत हा २०१४ पासून घराबाहेर असून तो कुटुंबीयांच्या संपर्कात नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळताच त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, या टोळीने वागळे इस्टेट, साकीनाका आणि घाटकोपर येथील नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे.
रोहित परिहार (३६) रा. कावेसर, घोडबंदर , संजय दुबे (३५) रा. नवी मुंबई, मूळगाव उत्तर प्रदेश, प्रसन्ना सावंत (२५) रा. नवी मुंबई आणि रणजित सिंग (३५) रा. नवी मुंबई अशी चौकडीची नावे आहेत.आरोपींनी ठाण्यातील व्यावसायिक सुनील काळे (४८) यांच्या पत्नीने व्यक्तिगत कर्ज घेण्यासाठी विविध बँकांमध्ये केलेल्या आॅनलाइन अर्जांची माहिती काढली.
बँकेचे एजंट असल्याचे भासवून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कर्जमंजुरीसाठी लागणारे काही दस्तावेज आणि दोन रद्द धनादेश घेतले होते. या रद्द धनादेशांवर मॅजिक पेनने केलेल्या खुणा खोडून या चौकडीने सरजोत जैन नामक व्यक्तीचे बनावट पॅनकार्ड दाखवून तक्रारदारांच्या बँकेतून ४० हजारांची रक्कम काढली होती.