बनावट प्रमाणपत्राद्वारे मेडिकल व्यवसाय करणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:32 AM2019-04-13T00:32:12+5:302019-04-13T00:33:11+5:30
जानेवारी २०१९ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अशी बनावट प्रमाणपत्रे देणाºया टोळीतील संस्थाचालकांसह १३ जणांची धरपकड केली होती.
ठाणे : बनावट डी-फार्मसीचे प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे औषधविक्रीचा व्यवसाय करणाºया दुकानदार आणि बनावट प्रमाणपत्र देणाºया टोळीतील आणखी चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने गुरुवारी (११ एप्रिल) अटक केली आहे. याच टोळीतील १३ जणांना यापूर्वीच अटक केल्यामुळे आता या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १७ च्या घरात गेली आहे.
जानेवारी २०१९ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अशी बनावट प्रमाणपत्रे देणाºया टोळीतील संस्थाचालकांसह १३ जणांची धरपकड केली होती. ठाण्यातील ढोकाळी भागातील ‘दीप पॅरामेडिकल आॅर्गनायझेशन’ ही संस्था डी फार्मसीच्या बनावट प्रमाणपत्राची विक्री करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे तसेच सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. याच चौकशीमध्ये आता कमलेश पटेल (२३, रा. ठाणे), जगदीश चौधरी (४२, रा. कळवा, ठाणे), वजाराम चौधरी (३६, रा. डोंबिवली) आणि चुनीलाल चौधरी (५०, रा. आजदेगाव, डोंबिवली) या आणखी चौघांना ११ एप्रिल रोजी अटक केली आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
झाला आहे.
१९ जानेवारी रोजी अरविंदकुमार भट, राजू यादव, बुधाराम अजेनिया, बलवंतसिंग चौहान, पुरु षोत्तम ताहिलरमानी, विशाल पाटील या सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण मेडिकल दुकाने चालवणारे फार्मासिस्ट असल्याची माहिती होती.
चौकशीत दीप पॅरामेडिकल आॅर्गनायझेशन या संस्थेत प्रवेश घेऊन त्यांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र मिळवल्याचे उघड झाले. त्यांच्याकडे माध्यमिक शिक्षा परिषद महाराष्ट्र, माध्यमिक शिक्षा परिषद उत्तर प्रदेश, माध्यमिक शिक्षा परिषद अजमेर, नवी दिल्ली या संस्थांच्या नावाची बनावट प्रमाणपत्रे मिळाली. तसेच डी फार्मसीचे प्रशिक्षण न घेताही ताहिलरामानी यांच्याकडून मेडिकल स्टोअर्स चालू केल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी संस्थाप्रमुख ताहिलरामानी यालाही पोलिसांनी अटक केली. आता सर्व मेडिकल स्टोअर्सच्या चालकांच्या प्रमाणपत्रांची आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे.
दरम्यान, याच प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले. त्यानुसार, युनिट-१ च्या पथकाने या रॅकेटमधील नरेंद्र गेहलोत (३२, रा. नवी मुंबई), हरिशंकर जोशी (३८, रा. ठाणे), दीपक विश्वकर्मा (३०, रा. ठाणे) प्रेमचंद चौधरी (४०, रा. भिवंडी), प्रवीण गड्डा (५०, रा. ठाणे) आणि महेंद्र भानुशाली (३०, रा. डोंबिवली) या सहा जणांना अटक केली होती. तर, पुढील तपासात या घटनेत वरील चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.