मुलांच्या काळजीपोटी चार हजार ९३२ शाळांची घंटा खणाणलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:48 AM2021-09-10T04:48:52+5:302021-09-10T04:48:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण महिन्याभरापासून नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचे आदेश आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण महिन्याभरापासून नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचे आदेश आहेत. यानुसार जिल्ह्यात चार हजार ९७१ शाळांपैकी अवघ्या ३९ प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. उर्वरित शाळा ग्रामपंचायत, मनपा, नपा आदींची परवानगी आणि पालकांच्या संमतीने सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, सुरू झालेल्या या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण? अशी समस्या लक्षात घेऊन की काय उर्वरित चार हजार ९३२ शाळा सुरू करण्यासाठी, मात्र अजूनही संमत्ती मिळाली नाही.
जिल्ह्यातील काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, पण प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यासाठी लागणारे आदेश लेखी स्वरूपात काढले नसल्याची चर्चा जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या पुढे पेच निर्माण झाला आहे. याशिवाय मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण? असाही प्रश्न आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत प्राथमिक व माध्यमिकच्या केवळ ३९ शाळा सुरू करणे शक्य झाले आहेत. उर्वरित शाळा सुरू करण्यासाठी परवानगीसह संमत्ती आणि त्यानंतरची जबाबदारी आदींच्या चक्रव्यूहात शाळांची घंटा वाजण्यास विलंब झालेला आहे.
शाळा सुरू करण्यासाठी आधीच कोरोना प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्याचे नियोजन केले आहे. यावेळी सॅनिटायझेशन करण्याची सक्ती आहे. पण त्यासाठी लागणारा खर्च कोणी करावा. असाही एक पेच आहे. शाळांनी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती कोणी तरी खर्च करायला पाहिजे, असे स्पष्ट आदेश नाहीत.
---------
१ ) कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?
पहिली - १३४७६५
दुसरी - १४९२९२
तिसरी - १,५२,२५९
चौथी - १,५३,२६२
पाचवी - १,५२,७६६
सहावी - १,५३,६५९
सातवी - १,५२,८४५
आठवी - १,४३,०७८
नववी - १,४१,७८३
दहावी- १,३०,३३३
--------