दोन हजार करवंट्यामध्ये फुलली चार हजार झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:48+5:302021-07-09T04:25:48+5:30
ठाणे : वनमहोत्सवाच्या निमित्ताने ठाण्यातील ट्री मॅन विजय कट्टी यांनी हाती घेतलेल्या पर्यावरणीय प्रकल्पाला यश आले आहे. वनमहोत्सवाच्या पहिल्या ...
ठाणे : वनमहोत्सवाच्या निमित्ताने ठाण्यातील ट्री मॅन विजय कट्टी यांनी हाती घेतलेल्या पर्यावरणीय प्रकल्पाला यश आले आहे. वनमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांनी तब्बल दोन हजार नारळाच्या करवंट्यांमध्ये वृक्षारोपण केले असून सात दिवसांत यातील प्रत्येक करवंटीत दोन याप्रमाणे चार हजार झाडे फुलली आहेत. घरातील कोणतीही जागा न व्यापता घराची शोभा वाढविण्यासाठी आणि निसर्गाला आपले देणे या उद्देशाने असा प्रकल्प आपण घरात राबवू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
१ ते ७ जुलै या कालावधीत वनमहोत्सव साजरा केला जातो. ट्री मॅन कट्टी यांनी झाडांचे महत्त्व आणि घरातदेखील वृक्षारोपण करू शकतो हे पटवून देण्यासाठी त्यांनी हा महोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. प्लास्टिकच्या कुंड्याचा वापर न करता पर्यावरणस्नेही नारळाच्या करवंट्यांमध्ये वृक्षारोपण कसे करता येते याचे त्यांनी विद्यार्थी आणि इतर वृक्षप्रेमींना प्रात्यक्षिक दाखविले. पहिल्या दिवशी त्यांनी करवंट्यामध्ये वृक्षारोपण करून ते सात दिवस निरीक्षण करण्यासाठी वृक्षप्रेमींना आमंत्रित केले. सात दिवसांनंतर ती झाडे या करवंट्यामध्ये कशी फुलली हे त्यांनी या निरीक्षणात दाखवून दिले. त्यांनी केलेल्या या प्रकल्पाला जवळपास पाच हजार वृक्षप्रेमींनी पसंती दिली आहे.
कट्टी यांनी आपल्या घरात दोन हजार नारळाच्या करवंट्यामध्ये नासाने सुचविलेली हवा शुद्ध करणारी तब्बल चार हजार झाडे वाढविली आहेत. यात आठ प्रकारचे मनी प्लांट व आठ प्रकारांचे पिलो डेंड्रम अशी एकूण १६ प्रकारांची झाडे वाढविली आहेत. करवंटीमध्ये वरच्या आणि खालच्या दिशेने एक एक असे दोन झाडे वाढली आहेत. ही झाडे दोन्ही दिशेने वाढत असल्याने त्याने वृक्षप्रेमी आपल्या घराची भिंतदेखील सजवू शकतात असे सांगून घरात झाडे लावल्याने हवेतील कार्बनडाय ऑक्सॉइड शोषून घेण्यास मदत होईल असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षारोपण केले तर कोणतेही झाड हे व्यवस्थित वाढते असे ते कट्टी म्हणाले.
-------------