छत्तीसगड येथील चार वेठबिगार मजुरांची भिवंडीत महसूल विभागाने केली मुक्तता
By नितीन पंडित | Published: February 2, 2024 06:22 PM2024-02-02T18:22:19+5:302024-02-02T18:22:49+5:30
दोन अल्पवयीन मजुरांचा समावेश असून मालक व मजूर पुरविणारा एजंट अशा दोघांविरोधात पडघा पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भिवंडी: ठाणे जिल्ह्यात वीटभट्टी मालकां कडून आदिवासी मजुरांची वेठबिगार म्हणून आर्थिक व शारीरिक पिळवणूक करण्याचे प्रकार समोर येत असताना,परराज्यातून भिवंडी येथे मोबदला न देता चार महिन्यां पासून मजुरीच्या कामासाठी डांबून ठेवलेल्या चार मजुरांची भिवंडी तहसीलदार कार्यालयाने मुक्तता केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये दोन अल्पवयीन मजुरांचा समावेश असून मालक व मजूर पुरविणारा एजंट अशा दोघांविरोधात पडघा पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
छत्तीसगड राज्यातील सुरजपुर जिल्ह्या च्या भैयाथान तालुक्याच्या साबारावा या ग्रामीण गावातील आदिवासी गौड जातीचे इंद्रपाल जगन्नाथ सिंग वय ३०,मनबोध धनीराम वय ४९,बादल सोवित सिंग वय १४ व विकेश उत्तमसिंग वय १७ यांना मजूर पुरवठा करणारा एजंट शर्मा याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या चार जणांना तामिळनाडू राज्यातील कविन मनिवेल यांच्याकडे बोअरवेल गाडीवर खोदकाम करण्यासाठी मजुरीच्या कामावर चार महिन्यां पूर्वी लावले.तामिळनाडू येथील काम संपवून या कामगारांना बोअरवेल गाडीचा मालक केविन भिवंडी तालुक्यातील पडघा येथे एम एस ई बी च्या कामासाठी आणून ठेवले होते. दरम्यानच्या काळात या कामगारांना घरी जाऊ देत नव्हता व कामाचे पैसे ही देत नसल्याने इंद्रपाल याची पत्नी राजकुमारी हिने सुरजपुर चे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करीत आपल्या पतीस मालक कविन मनिवेल याने डांबून ठेवल्याची तक्रार केली.
सुरजपुरचे जिल्हाधिकारी यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना मेल द्वारे तात्काळ मजुरांच्या सुटकेची कार्यवाही करण्याबाबत कळविले.ठाणे जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार अभिजित खोले यांना या बाबत आदेश दिले.व त्यानंतर पडघा येथील मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांनी स्थानिक पडघा पोलिसांच्या मदतीने मजुरांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता ते पडघा येथील एमएसईबी पॉवर हाऊस याठिकाणी रात्री साडे आठ वाजता पॉवर हाऊसचे सबस्टेशनचे ठिकाणी विज लाईनचे आरथींग करीता खड्डे खोदण्याचे काम हे मजूर करीत असल्याचे समजले .त्याठिकाणी जावून या सर्व मजुरांना ताब्यात घेत त्यांना पडघा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याठिकाणी मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोअरवेल गाडीचा मालक केविन मनिवेल व एजंट शर्मा या दोघांविरोधात वेठबिगार बंधमुक्त व बाल कामगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.