ठाणे, पालघरमध्ये चार बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:51 AM2019-08-05T03:51:58+5:302019-08-05T03:52:08+5:30
मुसळधार पाऊस जीवावर बेतला
भिवंडी / मीरा रोड : भिवंडीत पुराच्या पाण्यात टेम्पोचालक व कामगार असे दोघे जण वाहून गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी दुपारी घडल्या. याशिवाय, मीरा रोड येथे एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह नाल्यात सापडला. तर वसईत एक चौदा वर्षांचा मुलगा वाहून गेला.
भिवंडीतील धापसीपाड्यातील ३0 वर्षीय मोहम्मद सलाम शेख हा टेम्पोचालक भिवंडीतील वडपे बायपास येथील गोदामातून माल भरून त्याची डिलिव्हरी देण्यासाठी वसई येथे जात होता. तो पारोळफाटा येथील पेट्रोलपंपालगतच्या रोडवरील मोरीवर असताना, तुंगारेश्वर डोंगराच्या नाल्याचा प्रवाह मोरीवरून वाहू लागल्याने त्या प्रवाहात मो. सलाम हा ओढला गेला. त्याचा पाय टेम्पोत अडकल्याने नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
दुसरी घटना सरवली एमआयडीसी रोडवरील गोविंदनगर येथे घडली. पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत असताना घर गाठण्यासाठी तीन कामगार पाण्यातून रस्ता काढत होते. त्यातील एक जण वाहून गेला. त्याचा शोध भिवंडी तालुका महसूल व कोनगाव पोलीस घेत आहेत.
तिसरी घटना मीरा रोड येथे घडली. येथील काशिमीरा भागातील नाल्यात एका वृद्धाचा मृतदेह रविवारी सापडला. नाल्यातून या व्यक्तीचा मृतदेह काढण्यात आला. त्याची ओळख पटलेली नाही. तर चौथ्या घटनेत पालघर जिल्ह्यातील वसईत पावन प्रजापती (१४) हा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला.