वसईत स्वाइनचे चार बळी
By admin | Published: July 2, 2017 05:36 AM2017-07-02T05:36:28+5:302017-07-02T05:36:28+5:30
विरार शहरात जून महिन्यात स्वाइन फ्लूने चार जणांचे बळी घेतले आहेत. तर १९ जणांना त्याची लागण झाली असून यातील तीन रुग्ण
शशी करपे/लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : विरार शहरात जून महिन्यात स्वाइन फ्लूने चार जणांचे बळी घेतले आहेत. तर १९ जणांना त्याची लागण झाली असून यातील तीन रुग्ण वसईतील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत तर बाकीचे मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात स्वतंत्र कक्ष नसल्याने रुग्णांना मुंबईत जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.
शहरात जून महिन्यात स्वाइन फ्लूची लागण लागली होती. एकट्या जून महिन्यात स्वाइन फ्लूने शहरातील चार जणांचे बळी घेतले. यातील एक रुग्ण नालासोपाऱ्यातील रिध्दी विनायक हॉस्पीटलमध्ये तर तीन रुग्ण मुंबईच्या हॉस्पीटलमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये विरार येथील एका दीड वर्षाच्या मुलासह नायगाव येथील ७१ वर्षीय पुरुष, माणिकपूर येथील ६० वर्षीय महिला आणि विरार येथील ३० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
३० जूनपर्यंत स्वाइन फ्लूची लागण झालेल्या १९ रुग्णांची नोंद आहे. यातील तीन रु्ग्ण सध्या बंगली येथील कार्डीनल ग्रेशस हॉस्पीटल आणि एक रुग्ण नालासोपारा येथील रिध्दी विनायक हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे. १९ पैकी काही रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
स्वाइन फ्यू अतिशय संसर्गजन्य रोग असल्याने स्वाइन फ्लूच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची (आयसोलेटेट वॉर्ड) ची गरज असते. त्यासाठी खर्च अधिक असल्याने आणि निगा राखणे महापालिकेच्या आवाक्याबाहेरची बाब आहे. महापालिकेच्या मालकीची दोन हॉस्पीटल आणि २१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.
याठिकाणी गरोदर महिला, नवजात बालके यांची उपचार घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णाला दाखल करून त्याच्यावर उपचार करणे अतिशय जोखमीचे काम आहे. म्हणूनच महापालिकेने स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी औषधाचा साठा उपलब्ध करून ठेवला आहे. त्याचबरोबर स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णाच्या परिसरात जाऊन आरोग्य पथक तपासणी करीत आहे.
संशयास्पद वाटल्यास संबंधितांवर औषधोपचार केले जात आहेत. त्याचबरोबर नागरीकांमध्ये जनजागृती करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश प्रजापती यांनी दिली.
स्वाइन फ्लूवर उपचार करण्यासाठी त्यामुळे मुंबईतील खाजगी हॉस्पीटलमध्ये धाव घ्यावी लागत आहे. म्हणूनच नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सर्दी, खोकला, ताप, घसादुखी असा आजार झाल्यास उपचार करावेत. खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने नागरीकांनी ताबडतोब उपचार सुुरु करावेत, असे आवाहनही डॉ. प्रजापती यांनी केले आहे. स्वाइन फ्यूची तपासणी करण्यासाठी वसईतील सर डी. एम. पेटीट हॉस्पीटल आणि तुळंींज येथील हॉस्पीटलमध्ये पूर्णवेळ इतर सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आयसोलेशन वॉर्ड तत्काळ
सुरू करण्याची गरज
या फ्ल्यूची बाधा सर्वसाधारण वस्त्यांतील गोरगरिब रहिवाशांना होते. व ते मुंबईला जाऊन उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने दोन प्रमुख रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरू करावा, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. ती पूर्ण झाल्यास स्वाईनला पायबंद बसून जनतेलाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.