चार वर्षांपूर्वीच्या खूनाचा छडा: पत्नीच्या खूनप्रकरणी ठाणे पोलिसांनी केली पतीला अटक
By जितेंद्र कालेकर | Published: January 21, 2018 11:30 PM2018-01-21T23:30:08+5:302018-01-21T23:30:08+5:30
शिर नसलेला एका महिलेचा देह चार वर्षांपूर्वी मुंब्रा पोलिसांना मिळाला होता. याच खून प्रकरणी महिलेच्या पतीला खून आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे.
जितेंद्र कालेकर
ठाणे: चार वर्षांपूर्वी मुंब्रा परिसरात शिर आणि पाय नसलेले केवळ धड पोलिसांना मिळाले होते. याच खून प्रकरणी त्याच महिलेच्या पतीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. माणूसकीला अक्षरश: काळीमा फासणारे कृत्य या पतीने केल्याचे तपासातून समोर आले. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून तो आपल्याच पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीवरही लैंगिक अत्याचार करीत होता. त्याला सुरुवातीला बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे.
मुंब्य्रातील, कौसा भागातील शिवाजीनगर येथे राहण-या महंमद अब्दुल्ला तजमुल शेख उर्फ बिरेंद्र सहा (५०, मुुळ रा. बिहार) याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. २२ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास मुंब्रा बायपास येथील गीते कंपाऊंडजवळ एका प्लास्टीकच्या गोणीमध्ये एका महिलेचा शीर आणि पाय नसलेला देह मुंब्रा पोलिसांना मिळाला होता. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास मुंढे यांनी या प्रकरणाचा तपास न लागल्यामुळे डीएनए अहवाल मुंबईतील न्यावैद्यक प्रयोगशाळेत राखून ठेवला होता. ज्या दिवशी हा अर्धवट मृतदेह पोलिसांना मिळाला होता, तेंव्हापासून शिवाजीनगर, कौसा भागातील एक महिला बेपत्ता आहे. मात्र, ती हरविल्याची कोणतीही तक्रार तिचा पती अब्दुल्ला शेख याने दाखल केली नव्हती, अशी माहिती एका खास खबºयाने सहायक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे यांना दिली. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बोरसे यांच्यासह हवालदार सुनिल गिरे, सुदाम पिसे आणि दत्ता गायकवाड आदींच्या पथकाने अब्दुल्ला शेख याला १५ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्याला पोलिसांनी ‘बोलते’ केल्यानंतरही तो उडवाउडवीचीच उत्तरे देत होता. त्याच्या पहिल्या पत्नीलाही याच प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर मात्र तिने धक्कादायक माहिती दिली. त्याने एकूण चार विवाह केले असून तिच्याच १३ वर्षांच्या मुलीवर तो गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार करीत होता. धार्मिक ग्रंथाचा आधार देऊन तो असे करणे म्हणजे चांगले कर्म केल्यासारखे असल्याचे तो मुलीला आणि पत्नीला भासवित होता. तर पत्नीला ठार मारण्याची धमकी देत मुलीवर बिनधिक्कतपणे अत्याचार करीत होता. आता आपले कोणीही काहीही करु शकणार नाही, याच अविर्भावात असतांनाच मुंब्रा पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.
बहुपत्नीत्वासाठी धर्मांतर
मुस्लीम धर्म स्विकारल्यानंतर आपल्याला एकापेक्षा अनेक विवाह करता येतील, हा समज असल्यामुळे मुळच्या बिरेंद्र सहा याने १६ वर्षांपूर्वी मुस्लीम धर्म स्विकारला. पहिली पत्नी आवडत नसल्यामुळे त्याने दुसरा विवाह केला. कालांतराने तिसराही विवाह केला. दुस-या आणि तिस-या पत्नीला त्याने अल्पावधीतच ‘तलाक’ दिला.
आता आपण अगदी मनासारखे करु शकतो, असा समज झाल्यानेच तबस्सूम या तरुणीशी त्याने चौथा निकाह केला. सुरुवातीचे काही दिवस बरे गेल्यानंतर तिच्याही चारित्र्यावर तो संशय घेऊ लागला. याच संशयातून त्याने तिची एका खंजीराने अत्यंत निर्घृणपणे हत्या करुन शिर धडावेगळे करुन एका प्लास्टीकच्या गोणीत धड मुंब्रा बायपासवर फेकून दिल्याचे तपासात उघड झाले. अंगावर शहारा आणणा-या या घटनेचा तपास करतांना पोलीस त्याच्या घरी पोहचले. त्यांनी त्याच्या पहिल्या पत्नीला ताब्यात घेतले, तेंव्हा तो त्यांच्याच १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याची धक्कादायक बाब तिने पोलिसांना सांगितली. या प्रकरणात त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सोमवारी त्याला पत्नीच्या खून प्रकरणात पुन्हा अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन्ही पत्नीपासून सहा मुले
अब्दुल्ला याला पहिल्या पत्नीपासून १७ वर्षीय मुलगा, दुसरी १३, तिसरी ११ आणि चौथी आठ वर्षीय मुलगी अशी चार अपत्ये आहेत. तर चौथ्या पत्नीचा खून केला त्यावेळी तिला एक महिन्यांचा आणि दीड वर्षांचे अशी दोन मुले होती. या सहा मुलांसह तो पहिल्या पत्नीसमवेत मुंब्य्रात वास्तव्याला होता.