बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यात बुडून घाटकोपरच्या चार तरुणांचा मृत्यू

By पंकज पाटील | Published: October 21, 2022 06:29 PM2022-10-21T18:29:02+5:302022-10-21T18:29:53+5:30

Kondeshwar Waterfall: बदलापूर शहरालगत असलेल्या कोंडेश्वर धबधब्यात बुडून ४ मुलांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

Four youths of Mumbai drowned in Kondeshwar Waterfalls in Badlapur | बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यात बुडून घाटकोपरच्या चार तरुणांचा मृत्यू

बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यात बुडून घाटकोपरच्या चार तरुणांचा मृत्यू

googlenewsNext

- पंकज पाटील
बदलापूर: बदलापूर शहरालगत असलेल्या कोंडेश्वर धबधब्यात बुडून ४ मुलांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. कोंडेश्वरच्या धबधब्यावर पोहण्यास बंदी असताना देखील हे तरुण त्या ठिकाणी पोहोचलेच कसे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

     घाटकोपर कामराजनगर येथे राहणारा आकाश झिंगा याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे इतर चार साथीदार कोंडेश्वर येथे फिरण्यासाठी आले होते. कोंडेश्वरच्या धबधब्यावर पोहण्यास बंदी असताना देखील हे तरुण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. दुपारी दीड वाजताच्या सुमारास या तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. त्या तरुणांना वाचवण्यात त्याच्या इतर मित्रांनी प्रयत्न केला. यावेळी प्रतीक हाटे हा तरुण वगळता त्याचे इतर चार मित्र पाण्यात बुडाले.

त्यात आकाश झिंगा,सुरज साळवे, स्वयंम मांजरेकर आणि लिनस उच्चपवार या तरुणांचा समावेश होता. हे चौघेही घाटकोपरचे रहिवासी आहेत. या प्रकरणाची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी लागलीच या तरुणांना पाण्यातून बाहेर काढले मात्र तोपर्यंत या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या चौघांचे मृतदेह बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. कोंडेश्वर धबधब्यावर पोहण्यास सक्त मनाई असून त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी कोणतेही पर्यटक जाऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येतो. मात्र गेल्या काही दिवसात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने त्या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त काढण्यात आला होता.

धबधब्यात पाण्याचा प्रवाह जास्त नसला तरी त्या ठिकाणी असलेल्या कपारीत अडकून अनेकांचे याआधी देखील मृत्यू ओढवले होते. त्यामुळेच कोंडेश्वर धबधब्यावर पोहण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. असे असताना देखील हे तरुण त्या ठिकाणी पोहोचलेच कसे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

Web Title: Four youths of Mumbai drowned in Kondeshwar Waterfalls in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.