आगरी शालेचे चौथे सत्र संपन्न, आगरी शालेन आला...दादूस दुबईवाला....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:49 PM2018-05-07T15:49:46+5:302018-05-07T15:49:46+5:30
आगरी शालेचे चौथे सत्र ५-६ मे रोजी कशेळी येथील मराठी शाळेत पार पडले.
ठाणे : आगरी बोली प्रचार-प्रसाराच्या संवर्धनाच्या उद्देशार्थ युवा साहित्यिक सर्वेश तरे यांच्या संकल्पनेतून ‘आगरी शाला’ हा अभिनव उपक्रम सुरू झाला असून सर्व स्थरातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे या शाळेचे चौथे सत्र ५-६ मे रोजी कशेळी येथील मराठी शाळेत पार पडले.
५ मे रोजी प्रा. सदानंद पाटील यांनी आगरी बोली जडण-घडण विषयीचे सत्र घेतले त्यात त्यांनी 'आगरी बोली मुळत: शुध्द बोली असून तिचा प्रसार माध्यमातला चुकीचा वापर थांबला पाहिजे' असे सांगीतले. त्या नंतर दुसरे सत्र मोरेश्वर पाटील यांनी 'आगरी भाषेचे मुळ' या विषयी घेतले व आगरी भाषा फार पूरातन बोली आहे हे बुचर (Butcher island)’ नावाच्या घारापूरी बेटाजवळील 'आगर भूमितील' अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे व वेगवेगळ्या शिलालेखांचे दाखले देत आगरी बोली फार पुरातन बोली असल्याचे सांगीतले. त्याच बरोबर आगरी बोली शिकायची सोपी पध्दत-आपल्या वाक्यात *वं* आणि *न* चा योग्य वापर करणे.'वं' म्हणजे 'च्या वर' आणि 'न' म्हणजे च्या मध्ये. उदा.शेतावं,खल्यावं,रस्त्यावं. शेतान,खल्यान,रस्त्यान. ईत्यादी. सांगीतली. ६ मे रोजी उरणहून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.एल बी पाटील आले होते. त्यांनी आगरी साहित्याचे दाखले देत परेन जांभळे,शंकर सखाराम यांची आवर्जून आठवण काढली. त्याच बरोबर आगरी बोलीत पौरहित्य करण्याऱ्या धवलारीन यांच मौखिक स्वरुपातील साहित्य जर का पुस्तकरूपात छापले असते तर जगातील सगळ्यात जास्त लेखिका आगरी समाजातल्या ‘धवलारीनी’ असत्या असे प्रा.एल.बी पाटील यांनी मत प्रकट केले. विशेष म्हणजे या सत्रा दरम्यान दुबईमध्ये अभियंता म्हणून काम करणारे मंगेश पाटील थेट दुबईवरून विडीओ काॅल च्या माध्यमातून या सत्रात सहभागी झाले होते. दुबईमध्ये असून देखील तेथे आवर्जून आपली बोली बोलत विडीओ ब्लाॅग तयार करत मंगेश पाटील ‘दुबईकर दादुस’ या नावाने समाजमाध्यमांमध्ये प्रसिध्द आहेत. 'आपली बोली भाषा जर का मी विदेशात बोलून प्रसिध्द होऊ शकतो तर आपल्या माणसांनी नक्कीच आपल्या भागात आपली बोली बोलायला पाहिजे' असे मत मंगेश पाटील यांनी व्यक्त केले तसेच आगरी शालेत सर्वांनी सहभागी व्हा यासाठी आवाहन केले. आगरी शालेचे पुढील सत्र १२-१३ मे तसेच १९-२० मे रोजी ४ ते ६ या वेळात कशेळी येथे होणार असल्याचे कवी सर्वेश तरे यांनी सांगीतले आहे.