सुगंधी वृक्षांना झोलची दुर्गंधी, १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प हा मोठा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 05:35 AM2018-10-06T05:35:58+5:302018-10-06T05:36:30+5:30
खर्चात ६४ टक्के वाढ : जूनमध्ये वृक्षलागवड केल्यावर मंजुरीचा ठामपाचा खटाटोप
ठाणे : राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. गतवर्षी एक सुगंधी वृक्ष लावण्याकरिता व त्याची निगा राखण्याकरिता १२३३ रुपये खर्च होत होता. यंदा हाच खर्च १९०० रुपयांवर गेला आहे. वृक्षलागवडीच्या खर्चात वर्षाकाठी आठ टक्के वाढ अपेक्षित धरली असताना प्रत्यक्षात ही वाढ ६४ टक्क्यांच्या घरात आहे. जून महिन्यात लागवड केलेल्या वृक्षांकरिता आता आॅक्टोबरमध्ये मंजुरी घेण्याचा खटाटोप सुरू आहे.
ठाणे महापालिकेने ५० हजार वृक्ष स्वत: लावले असून तेवढेच वृक्ष लावण्याकरिता ठाणेकरांना देणार आहे. बहुतांश सुगंधी वृक्ष रस्त्यांच्या मधील दुभाजकांवर लावण्यात येणार आहेत. बोरिवडे भागात सुगंधी वृक्षांची लागवड केल्याचा दावा प्रशासनाने केला असताना प्रत्यक्षात नागरिकांच्या विरोधामुळे तेथे एकही वृक्ष लावला नसल्याचे वास्तव शुक्रवारी पत्रकारांच्या दौऱ्यात उघड झाले. गेल्या तीन वर्षांत पालिकेने तीन लाख वृक्षांची लागवड केली आणि निगा देखभालीचे काम एफडीसीएमएलाच दिले. त्यासाठी ३७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, प्रत्येक वृक्षासाठी अंदाजे १२३३ रुपये खर्च येतो. मात्र, यंदा ५० हजार वृक्षलागवडीसाठी प्रत्येक वृक्षामागे अंदाजे खर्च १९०० रुपये होणार आहे. वृक्षलागवडीच्या खर्चात एवढी प्रचंड वाढ कशी झाली, असा सवाल उपस्थित झाला आहे. उर्वरित ५० हजार वृक्षखरेदी करून त्याची लागवड आणि देखभालीची जबाबदारी ठाणेकरांवर टाकली जाणार आहे. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत सादर केलेल्या प्रस्तावात एक लाख वृक्षलागवडीचा यंदाचा संकल्प असून पाच वर्षे देखभाल करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जर, ५० हजार वृक्ष महापालिका व तेवढेच वृक्ष ठाणेकर लावणार होते, तर दोघांकडून लावण्यात येणाºया वृक्षांच्या खर्चात प्रचंड तफावत का आहे, असा प्रश्नही केला जात आहे. त्यामुळे अगोदरच स्थायी समिती वादाचा विषय झालेल्या या प्रस्तावाबाबत संशयाचे धुके पसरले आहे.
सुगंधी वृक्षलागवडीची पाहणी करण्याकरिता शुक्रवारी प्रशासनाने पत्रकारांचा दौरा नेला होता. यावेळी पालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, संदीप माळवी, वृक्ष अधिकारी केदार पाटील तसेच महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) अधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावात ज्या बोरिवडे भागात सुगंधी वृक्षांची लागवड केल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता, तेथे वृक्षांची लागवड करण्यात आलेली नसून शहरातील काही ठिकाणी रस्ता दुभाजकांवर सुगंधी वृक्षांची लागवड करण्यात आल्याचा खुलासा पालिका प्रशासनाने केला. एक लाख वृक्षलागवडीच्या संकल्पापैकी ५० हजार वृक्षांची पारसिक डोंगरावर लागवड केल्याचा नवा दावा प्रशासनाने केला. या वृक्षांच्या पाच वर्षे देखभालीवर तब्बल नऊ कोटी ३४ लाखांचा खर्च केला जाणार आहे. जो मागील वर्षीच्या खर्चाच्या तुलनेत तब्बल ६४ टक्क्यांनी जास्त आहे. उर्वरित ५० हजार वृक्ष केवळ ३२ लाखांत खरेदी करून ठाणेकरांना लागवडीसाठी दिले जाणार आहेत. त्यातही ज्या वृक्षांवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे, त्या सुगंधी वनस्पतींसाठी वेगळे १० कोटी खर्च केले जाणार असल्याचे वृक्ष प्राधिकरण विभागाने स्पष्ट केले आहे. घोडबंदर रोडवरील बोरिवडे गावात वृक्ष लावणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिकांनी विरोध केल्याने पालिकेने पारसिकच्या डोंगरावर वृक्ष लावल्याचे स्पष्ट केले. मुळात स्थानिकांनी फेब्रुवारी महिन्यात विरोध केला होता. त्यानंतर, वनविभागाने जून महिन्यात शीळ, पारसिक या परिसरातील जागा सुचवल्या होत्या. असे असतानाही प्रशासनाने प्रस्तावात बोरिवडेचा उल्लेख तसाच ठेवून वादाला निमंत्रण दिले. या ठरावाला १८ जुलै रोजी मंजुरी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात काम जून महिन्यातच सुरू केल्याची माहिती उघड झाली. सर्वसाधारण सभेने सप्टेंबर महिन्यात हा प्रस्ताव फेटाळला आहे. मात्र, तोपर्यंत वृक्षांची लागवडही झाली होती. लोकप्रतिनिधींच्या अधिकारांना प्रशासनाने अक्षरश: केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. एक लाख वृक्षलागवड झाली असून त्याचे जीओ टॅगिंगही झाल्याचे उत्तर प्रशासनाने स्थायी समितीत दिले होते. परंतु, यंदा लागवड झालेल्या वृक्षांचे जीओ टॅगिंग झालेच नसल्याचे अधिकाºयांनी शुक्रवारी मान्य केले. अवघ्या दोनच दिवसांत प्रशासनाने घूमजाव केल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
प्रदूषणापुढे सुगंधी वृक्ष टिकतील का?
रस्त्याच्या मधोमध जाई, मोगरा, चाफा, प्राजक्त यासारख्या अत्यंत नाजूक सुगंधी वृक्षांची लागवड केल्यास वाहनांच्या प्रदूषणापुढे ती टिकाव धरतील का, असा सवाल केला जात आहे. वादग्रस्त ठरत असलेल्या प्रस्तावाची माहिती देण्यासाठी वृक्ष अधिकारी केदार पाटील हे पालिकेच्याच एका वरिष्ठ अधिकाºयांच्या दालनात गेले होते.
त्यावेळी रस्त्यावरील प्रदूषणापुढे या वनस्पती टिकतील का, असा सवाल या अधिकाºयाने पाटील यांना करून त्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. सुगंधी वनस्पतींच्या रातराणी, कामिनी, जाई, मोगरा, सोनटक्का, गवती चहा, सोनचाफा, प्राजक्त, चाफा, बकुळ, सुरंगी आणि अनंत अशा १२ प्रजातींच्या वनस्पतींची लागवड करण्याचे पालिकेने ठरवले आहे. प्रत्येक प्रजातीची १० हजार याप्रमाणे एक लाख सुगंधी वनस्पतींची लागवड केली जाणार आहे.
उथळसर, वर्तकनगर, माजिवडा-मानपाडा, वागळे, रायलादेवी, लोकमान्यनगर, सावरकरनगर या भागांतील रस्त्यांच्या दुभाजकावर ही झाडे लावण्यात येणार आहेत. गावंड बाग येथील रस्त्याच्या दुभाजकांमध्ये तब्बल २५ हजार वृक्षांची लागवड केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रकरण चिघळण्याचे संकेत
दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत सुगंधी वृक्षलागवडीच्या मुद्यावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. वृक्षलागवड होणार आहे, असा सर्वांचा समज होता. प्रत्यक्षात ही वृक्षलागवड झाली असून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठवण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या गोंधळातच शुक्रवारी प्रशासनाने नवनवे दावे केल्याने हे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत.