शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक
By जितेंद्र कालेकर | Published: February 23, 2024 10:04 PM2024-02-23T22:04:14+5:302024-02-23T22:04:38+5:30
कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा; आरोपी पसार
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून कळवा पारसिकनगर येथील व्यावसायिक घनश्याम क्षीरसागर (५०) यांची एका भामट्याने चार लाख ९३ हजार ७९५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी शुक्रवारी दिली.
कळव्यातील रहिवासी क्षीरसागर यांना नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात एका अनोळखी फेसबुकधारक भामट्याने फेसबुकवर शेअर मार्केटिंगसाठी जाहिरात पाठवली. त्यामधील व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यासही त्यांना भाग पाडले. त्यानंतर या ग्रुपवर लिंक पाठवून त्यामध्ये मेगथर्म इंडक्शन कंपनीचे आयपीओ खरेदी करण्यासाठी क्षीरसागर यांना चार लाख ९३ हजार ७९५ इतकी रक्कम ऑनलाइन पाठवण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत क्षीरसागर यांनी २२ फेब्रुवारी रोजी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक वल्टे हे अधिक तपास करीत आहेत.