वैद्यकीय शाखेत प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 12:16 AM2021-03-08T00:16:52+5:302021-03-08T00:17:15+5:30
ठाण्याच्या तरुणीस पाच लाखांचा गंडा
ठाणे : व्यवस्थापन कोट्यातून वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या सुधीर चव्हाण याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ठाण्यातील बी केबिन नौपाडा भागात राहणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने यासंदर्भात २६ फेब्रुवारी २०२१ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. बारावी विज्ञान शाखेतून ७८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली ही विद्यार्थिनी वैद्यकीय नीट प्रवेशाची तयारी करीत आहे. मेडिकलच्या प्रवेशासाठी सरकारी महाविद्यालयात ९९ टक्के मेरिट लागल्यामुळे प्रवेश बंद झाले होते.
एका ओळखीच्या व्यक्तीने या मुलीची मुंबईतील सुधीर चव्हाण यांच्याशी ओळख करून दिली होती. तेव्हा सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये व्यवस्थापनाच्या कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे सांगून चव्हाण याने ३१ ऑगस्ट २०१९ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये या विद्यार्थिनीकडून पाच लाख २० हजारांची रक्कम वेगवेगळ्या दिवशी घेतली. त्यासाठी आपली मंत्रालयात मंत्र्यांकडे ओळख असल्याचेही भासविले होते.
अलिबागेतून अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, उपनिरीक्षक सूरज जोंधळे, विनोद लभडे आणि गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने सुधीर चव्हाण याला अलिबाग येथून ४ मार्च रोजी अटक केली. त्याने आणखी कोणाची अशाप्रकारे फसवणूक केली आहे का, याबाबत चौकशी सुरु आहे.