वीजबिल थकल्याचा बहाणा करीत ७५ हजारांची फसवणूक. चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Updated: October 30, 2022 19:46 IST2022-10-30T19:46:30+5:302022-10-30T19:46:42+5:30
याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी रविवारी दिली.

वीजबिल थकल्याचा बहाणा करीत ७५ हजारांची फसवणूक. चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा
ठाणे: वीज थकल्याचा बहाणा करीत टीम व्यूवर क्वीक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडून वसंत विहार येथील कांचन गायकवाड (५०) या महिलेची एका भामट्याने ७५ हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी रविवारी दिली.
वसंत विहार सुरंगी व्होल्टास कॉलनी येथे राहणाऱ्या गायकवाड यांना २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते ८.५२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर वीजबिल थकल्याचा मेसेज आला. त्यानंतर मेसेज पाठविणाऱ्याने त्यांना कॉल करून ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी त्यांना टीम व्यूवर क्वीक सपोर्ट हा ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर ओटीपी तसेच एटीएम कार्डची माहिती मागितल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या बँक खात्यातून दहा रुपये काढण्यात आले.
त्यापाठोपाठ तीन वेळा प्रत्येकी २५ हजार रुपये असे ७५ हजार रुपये ऑनलाइन काढण्यात आले. फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित बँकेस ही माहिती देऊन खात्यावरील व्यवहार बंद केले. त्यानंतर याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.