विमा रक्कमेवर परस्पर कर्ज काढून व्यवसायिकाची दीड कोटीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 05:52 PM2022-02-21T17:52:12+5:302022-02-21T17:52:18+5:30
भिवंडीत बँक व्यवस्थापका विरोधात गुन्हा दाखल
भिवंडी- बँक व्यवस्थापकाने बँकेत इतर कामासाठी येणाऱ्या बँक ग्राहकाचा विश्वास संपादन करून आपल्या पत्नी विमा प्रतिनिधी असल्याने तिच्या मार्फत भिवंडीतील एका व्यवसायीका कडून विमा ठेव रक्कम स्वीकारून त्या रक्कमेवर परस्पर कर्ज काढून अपहार केल्या प्रकरणी बँक व्यवस्थापक व विमा अधिकारी यांच्या विरोधात शनिवारी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
भिवंडी येथील व्यवसायिक नरसय्या राजेय्या गाजुला ( वय ५८ ) यांचे कामानिमित्त सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया, बि.के.सी. शाखा, मुंबई चे अधिकारी बाळकृष्ण अय्यर यांच्या संपर्कात आले असता त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत आपली पत्नी विमा प्रतिनिधी असल्याचे सांगत त्यांच्या कडून एक रक्कमी विमा गुंतवणूक म्हणून ९९ लाख ९९ हजार ७७८ रुपये स्वीकारले .परंतु त्यांना पॉलिसीचे मूळ प्रत न देता कव्हर नोट दिली. त्यानंतर बँक कर्मचारी बाळकृष्ण अय्यर व समीर दास व अन्य विमा अधिकारी यांनी आपापसात संगनमत करून विमा धारकाने कोणतीही मागणी केली नसतानाही परस्पर विमा पॉलिसी वर कर्ज प्रकरण तयार करून त्यावर खोट्या सह्या करून कर्ज काढून पैशांचा अपहार केला. त्यानंतर मूळ रक्कमे सह व्याज बोनस अशी एकूण १ कोटी ४९ लाख ७० हजार रुपये न देता फसवणूक केली .या प्रकरणी नरसय्या गाजूल यांनी ठाणे आर्थिक गुन्हे शाखे कडे तक्रार केल्या नंतर त्याची चौकशी करून बँक अधिकारी व विमा अधिकारी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे . मात्र आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही.