चाळीत खाेली देण्याच्या नावाखाली साडेसात लाखांची फसवणूक
By जितेंद्र कालेकर | Updated: October 30, 2022 19:44 IST2022-10-30T19:44:11+5:302022-10-30T19:44:28+5:30
कासारवडवली पाेलीस ठाण्यात गुन्हा : पैशांचा केला अपहार

चाळीत खाेली देण्याच्या नावाखाली साडेसात लाखांची फसवणूक
ठाणे: चाळीत खाेली देण्याच्या नावाखाली दगडू कुंभार (५५) यांची सात लाख ५० हजारांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी प्रवीण पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी रविवारी दिली.
मनोरमानगर भागात राहणारे कुंभार हे २०१९ मध्ये त्यांच्यासाठी घराच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना एका महिलेच्या ओळखीतून बांधकाम व्यावसायिक प्रवीण पाटील हे खारेगाव येथे सिमेंट पत्र्याचे छप्पर असलेल्या चाळीचे बांधकाम करीत असल्याची माहिती एका महिलेमार्फत मिळाली. कुंभार यांनी प्रवीण पाटील यांची भेट घेतली. तेव्हा त्याने चाळीत खाेली देतो, अशी त्यांना बतावणी केली. त्याच नावाखाली त्यांच्याकडून १८ जानेवारी २०२० ते ३० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत नागलाबंदर रोड भागात बँकेद्वारे तसेच रोख स्वरूपात सात लाख ५० हजारांची रोकड घेतली.
कुंभार यांना खाेली देण्यात येत असल्याचा करारनामा बनवून देण्यात आला. प्रत्यक्षात त्यांना चाळीत कोणतीही खाेली दिली नाही. तसेच साडेसात लाखांची रक्कमही त्यांना परत केली नाही. आपली फसवणूक करून पैशांचा अपहार केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर कुंभार यांनी याप्रकरणी ३० ऑक्टाेबर २०२२ रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राजेश कल्याण्णाप्पा हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.