नोकरीला लावण्याच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक: मध्यप्रदेशातील ठकसेनाला सांगलीतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 10:19 PM2020-09-23T22:19:19+5:302020-09-23T22:22:58+5:30
रेल्वेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली मध्यप्रदेशातील अनेक तरुणांना सुमारे एक कोटींचा गंडा घालून पसार झालेल्या टोळीतील नितीन पाटील उर्फनितीन आकाराम बारपटे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी पहाटे अटक केली. त्याच्यावर मध्यप्रदेश पोलिसांनी पाच हजारांचे बक्षिस जाहिर केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रेल्वेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली मध्यप्रदेशातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सुमारे एक कोटींचा गंडा घालून नितीन पाटील उर्फ नितीन आकाराम बारपटे (३४) हा पसार झाल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याला अटक केली.
मध्यप्रदेश सरकारने पाच हजारांचे बक्षिस घोषित केलेल्या नितीन याने ग्वाल्हेर भागातील १५ ते २० तरुणांकडून प्रत्येकी चार ते पाच लाखांची रक्कम रेल्वेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली घेतली होती. प्रत्यक्षात त्याने कोणालाही नोकरीला लावले नाही. तसेच त्यांचे पैसेही परत केले नाही. याप्रकरणी २०१९ मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीनच्या साथीदाराला ग्वाल्हेर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जानेवारी २०२० मध्ये अटक केली होती. नितीन मात्र त्यांना हुलकावणी देत होता. तो नवी मुंबईतल्या नेरु ळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्वाल्हेरच्या पोलीस अधीक्षकांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना या तपासात मदतीसाठी पत्र दिले होते. नितीन हा त्याच्या मुळगावी कामेरी (जिल्हा- सांगली) येथे असल्याची माहिती पोलीस नाईक अमोल देसाई यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांच्या पथकाने सांगली पोलिसांच्या मदतीने त्याला २३ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास कामेरी येथून अटक केली.
त्याला ठाणे न्यायालयाने ५ आॅक्टोबरपर्यन्त न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याला पुढील तपासासाठी गवाल्हेर पोलिसांच्या ताब्यात देण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.
* यापूर्वीही याच फसवणूकीच्या गुन्हयातील तुफेल मोहम्मद आणि सुलेमान शेख या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मुंब्रा येथून अटक करण्यासाठीही मध्यप्रदेश पोलिसांना मदत केली होती.