वेबसिरिजला एक कोटींचे फंडिग करण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 09:55 PM2021-07-02T21:55:37+5:302021-07-02T21:58:08+5:30
वेबसिरिजला एक कोटींचे फंडिग करण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक करणाऱ्या संतोष गोविंद मोरे (४६, रा. कोपरी, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वेबसिरिजला एक कोटींचे फंडिग करण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक करणाऱ्या संतोष गोविंद मोरे (४६, रा. कोपरी, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याला १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
संतोष तसेच त्याच्या अन्य तीन साथीदारांनी मुंबईतील नायगाव येथील रहिवाशी असलेल्या चित्तरंजन सिंग (२३) यांना वेबसिरिज तयार करण्यासाठी एक कोटींचे फंडिंग करतो, असे अमिष दाखविले. त्यासाठी सिंग यांना अगरवाल याने २० लाखांची रोख रक्कम घेऊन कापूरबावडी ते बाळकूम रोडवर रेवाळी तलावाच्या बाजूला २७ जून रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास बोलविले. तिथे संतोष मोरे, इमरान आणि अन्य एका अनोळखीने आपसात संगनमत करुन त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी केली. ते त्याठिकाणी धाड टाकण्यासाठी आले असल्याचेही त्यांनी भासविले. नंतर त्यांनी सिंग यांच्याकडील २० लाख रुपयांची बॅग घेऊन तिथून कारमधून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी सिंग यांनी २९ जून रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने २८ जून रोजी संतोष मोरे याला अटक केली. त्याला सुरुवातीला २ जुल २०२१ ैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या टोळीतील अन्य तिघांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.