परदेशी वित्तीय कंपनीतून कर्ज देण्याच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:39 PM2020-09-24T23:39:13+5:302020-09-24T23:39:24+5:30
दाम्पत्यास अटक : ११ कोटींच्या कर्जाचे दाखविले आमिष
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : व्हेनेझुएला येथील एका वित्तीय कंपनीतून १५ लाख युरो अर्थात भारतीय चलनातील ११ कोटी रुपयांचे कर्ज काढून देण्याच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक करणाऱ्या अविनाश जाधव आणि सपना जाधव या दाम्पत्याला ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
महागिरी कोळीवाडा येथील रहिवासी अशोक जाधव (५५) यांचा रियल इस्टेट सल्लागार म्हणून व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा अक्षय हा अभियंता असून तो बांधकामाची कामे करतो. त्यांना त्यांच्या बांधकाम व्यवसायासाठी काही रकमेची आवश्यकता होती. दरम्यान, अशोक जाधव यांची अविनाश जाधव (रा. दोस्ती कॉम्प्लेक्स, वर्तकनगर, ठाणे) यांच्याशी ओळख झाली. आपल्याला बांधकाम व्यवसायासाठी मोठ्या रकमेची गरज असल्याचे अशोक यांनी अविनाशला सांगितले. तेव्हा त्याने व्हेनेझुएला येथील ‘वॉको सेंटर आॅफ व्हेनेझुएला’ या परदेशी वित्तीय संस्थेतून ११ कोटींचे (१५ लाख युरो) कर्ज काढून देतो, असे त्यांना आमिष दाखविले. अविनाशने त्याची पत्नी सपना जाधव तसेच साथीदार किरण चाफेकर आणि राधिका चाफेकर यांच्या मदतीने अशोक यांचा विश्वास संपादन केला.
हे कर्ज मिळवून देण्यासाठी २२ लाखांची रक्कम विविध शुल्कापोटी भरावी लागेल, असेही त्यांनी भासविले. आपल्याला कर्ज मिळेल, या आशेपोटी अशोक जाधव यांनीही अविनाश आणि त्याच्या साथीदारांना १५ नोव्हेंबर २०१८ ते २१ मार्च २०२० या दोन वर्षांच्या कालावधीत ठाण्यातील जांभळीनाका येथील एका हॉटेलमध्ये तसेच सेंट जॉन हायस्कूलसमोरील अविनाश जाधव यांच्या कार्यालयात रोख तसेच धनादेशाद्वारे २२ लाखांची रक्कम दिली.
मात्र, अविनाश जाधव आणि त्याच्या साथीदारांनी कोणतेही कर्ज काढून न देता अशोक यांना एमबीएलसी (स्टॅण्ड बाय लेटर आॅफ क्रेडिट्स) या नावाच्या बनावट कंपनीची कागदपत्रे बनवून २२ लाखांचा अपहार केला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात आधी तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाची चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर, २१ मार्च २०२० रोजी या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने ठाण्याच्या वर्तकनगर येथून १७ सप्टेंबर २०२० रोजी अविनाश आणि त्याची पत्नी सपना जाधव या दोघांना अटक केली आहे.