जमिनीचे प्लॉट देण्याच्या नावाखाली तीन कोटींची फसवणूक: ‘दिशा’च्या संचालकाला अटक
By जितेंद्र कालेकर | Published: March 8, 2021 04:39 PM2021-03-08T16:39:51+5:302021-03-08T16:41:52+5:30
जमिनीचे प्लॉट देतो, अशी बतावणी करीत राज्यभरातील २५ जणांची तीन कोटी १५ लाख ५४ हजारांची फसवणूक करणाऱ्या दिशा डायरेक्ट मार्केटिंग सर्व्हिसेस आणि यश इन्फ्राव्हेन्चर कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नाईक याला ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: जमिनीचे प्लॉट देतो, अशी बतावणी करीत राज्यभरातील २५ जणांची तीन कोटी १५ लाख ५४ हजारांची फसवणूक करणाऱ्या दिशा डायरेक्ट मार्केटिंग सर्व्हिसेस आणि यश इन्फ्राव्हेन्चर कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नाईक याला ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट येथील रहिवाशी धर्मराज राव (६१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिशा डायरेक्टचा संचालक संतोष आणि त्याची पत्नी सुजाता तसेच अन्य एक संचालक चेतन चव्हाण यांनी ठाण्यातील तीन हात नाका येथील इटर्निटी मॉल मध्ये २०१० ते २०१६ या काळात कार्यालय सुरु केले होते. याच कार्यालयातून वेगवेगळे प्रोजेक्ट सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याद्वारे राज्यातील शहापूर तसेच सातारा, कर्जत आणि कसारा याठिकाणी या प्रोजेक्टमधील जमिनीचे प्लॉट देतो, असे सांगून वेगवेगळे प्रोजेक्ट दाखविले. पैसे गुंतविल्यावर दोन वर्षांच्या कालावधीनंतर जर गुंतवणूकदारास प्लॉट नको असल्यास त्यांनी गुंतविलेल्या रकमेच्या अर्धी रक्कम जास्त देऊन करार रद्द केला जाईल, अथवा प्लॉट पाहिजे असल्यास दोन वर्षांनंतर रितसर प्लॉटच्या सात बारा उताºयावर नाव नोंदवून प्लॉट गुंतवणूकदारांच्या नावावर केला जाईल, असेही अमिष दाखविले. दिशा डायरेक्टच्या संचालकांनी वेगवेगळया प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ठरल्याप्रमाणे प्लॉट आणि भरलेली रक्कम परत न देता धर्मराज आणि त्यांच्या पत्नीची १५ लाख २३ हजार ८५० रुपयांची आणि इतर २४ गुंतवणूकदारांची तीन कोटी ३१ हजार ५९ रुपयांची अशी एकूण तीन कोटी १५ लाख ५४ हजार ९०९ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सुरुवातीला १७ गुंतवणूकदारांनी १३ आॅगस्ट २०२० रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. यात आणखी गुंतवणूकदारानीही तक्रार केल्याने हे प्रकरण ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने संतोष नाईक याला ५ मार्च २०२१ रोजी अटक केली आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.