कंत्राट मिळविण्याचे आमिष दाखवून 32 लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:20 AM2020-12-14T00:20:10+5:302020-12-14T00:20:14+5:30
आरोपीस अटक; अन्य एका गुन्ह्यात मिळविला अंतरिम जामीन
ठाणे : अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून, जगदीप दुबे (३८, रा. ब्रम्हांड, ठाणे) यांची ३२ लाखांची फसवणूक करणाऱ्या रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा (५१, रा. माजीवडा, ठाणे) याला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. त्याला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रोहित याने त्याचे साथीदार भगवान पवार (३६), पल्लवी पवार (३६), विठाबाई पवार (५५) आणि विनोद शेट्टी (३९) यांच्या मदतीने दुबे यांना अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील उपाहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून जानेवारी, २०१६ ते ११ डिसेंबर, २०२० या काळात त्याने ३२ लाख रुपये घेतले. त्यानंतर, दुबे यांच्या नावाने उपाहारगृहाचे कंत्राट मंजूर झाल्याचा बनावट कार्यादेश त्यांना दाखविला. प्रत्यक्षात कोणतेही कंत्राट मिळवून न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर रोजी तक्रार दाखल होती. दरम्यान, रोहित हा ठाण्यातील गोल्डन डाइज नाका येथे येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे १२ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय भिवणकर, प्रशांत भुरके, संदीप भांगरे, महेश साबळे आणि रोशन जाधव आदींच्या पथकाने त्याला २४ तासांमध्ये ताब्यात घेतले.
त्याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली असून, ठाणे न्यायालयाने त्याला १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले
आहेत.
दुसऱ्या नावाने वावर
मार्च, २०२० मध्ये कासारवडवली येथील एका बारमध्ये झालेल्या हाणामारीच्या गुन्ह्यातही तो वॉन्टेड होता. यामध्ये त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता. रोहित हा अकबर पाशा या दुसऱ्या नावानेही वावरत होता.