नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक, ३७ लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:33 AM2018-01-19T00:33:19+5:302018-01-19T00:33:22+5:30
बँकेत मोठ्या पदावर नोकरीला असल्याचे भासवून दोन महिलांनी ठाण्याच्या चरईतील एका महिलेच्या नातेवाइकांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ३७ लाख ८५ हजार रुपये उकळले.
ठाणे : बँकेत मोठ्या पदावर नोकरीला असल्याचे भासवून दोन महिलांनी ठाण्याच्या चरईतील एका महिलेच्या नातेवाइकांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ३७ लाख ८५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जयश्री मोहिते आणि मेघा कदम या दोन महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे पश्चिमेतील चरई येथे वास्तव्यास असलेल्या तृप्ती परब यांना मोहिते आणि कदम या दोन महिलांनी बँकेत असल्याची बतावणी केली. परब यांचे पती, नणंद आणि भाऊ यांना कॅनरा बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत त्यांनी सुरुवातीला त्यांच्याकडून ८५ हजार रुपये घेतले. विश्वास संपादन होण्यासाठी त्यांनी हे पैसे बँकेत आॅनलाइनद्वारे वळते केले. पुढे हे काम होण्यासाठी मोठ्या अधिकाºयांनाही पैसे द्यावे लागतील, अशी बतावणी करत त्यांच्याकडून पुन्हा प्रत्येकासाठी ५० हजार ते तीन लाखांची रक्कम घेतली. कालांतराने या दोघींनीही त्यांना आपल्या घरी बोलवून पुन्हा लाखाच्या पटीत रकमा घेतल्या. यातील काही रकमा रोख तर काही धनादेशाद्वारे घेतल्या. २७ जानेवारी २०११ ते ७ आॅक्टोबर २०१३ या काळात त्यांनी परब यांच्या नातेवाइकांना बँकेत लावण्यासाठी ३७ लाख ८५ हजार रुपये घेतले. इतकी रक्कम घेऊनही तिघांपैकी कोणालाही त्यांनी बँकेत नोकरी लावली नाही. परब कुटुंबीयांनी या दोन्ही महिलांची चौकशी केल्यानंतर दोघींपैकी कोणीही बँकेत नोकरीला नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळेच या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून दोन्ही महिलांकडे पैशांचा तगादा लावला. तेव्हा त्यांनी तक्रारदारांनाच ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कुठेही तक्रार केल्यास आत्महत्या करू आणि चिठ्ठीमध्ये तुमची नावे टाकू, असाही कांगावा करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर परब कुटुंबीयांनी अखेर १६ जानेवारीला नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
कदम आणि मोहिते या दोन्ही महिलांनी चारच दिवसांपूर्वी रेखा परब यांच्याही मुलीला बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून दोन लाख १५ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. यापूर्वीही २००८ मध्ये अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यातही दाखल झाला आहे.