फुकटची स्पर्धा... आता जितेंद्र आव्हाड 'या' मराठी चित्रपटाचे मोफत शो दाखवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 12:00 PM2023-05-10T12:00:45+5:302023-05-10T12:38:46+5:30
राजकीय नेत्यांमध्ये चित्रपटावरुन आता फुकटची स्पर्धा लागल्याचे दिसून येते
ठाणे - देशभरात द केरळ स्टोरी या चित्रपटावरुन चांगलाच वादंग पेटला आहे. काही ठिकाणी चित्रपटाला बंदी घातली आहे, तर अनेक ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांचाही या चित्रपटात अधिक रस दिसून येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंगळवारी रात्री ९ वाजताचा शो पाहिला. त्यानंतर, प्रतिक्रिया देताना जितेद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. एकीकडे भाजप नेते द केरळा स्टोरी हा चित्रपट मोफत दाखवत असतानाच, आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मराठी चित्रपट मोफत दाखवण्याची घोषणा केली आहे. ठाण्यातील प्रभात टॉकीजमध्ये ते महाराष्ट्राचा शाहीर हा सिनेमा मोफत दाखवत आहेत.
राजकीय नेत्यांमध्ये चित्रपटावरुन आता फुकटची स्पर्धा लागल्याचे दिसून येते. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या खास शोचे आयोजन ७ मे रोजी कांदिवलीतील एका थेअटरमध्ये केले होते. लव्ह जिहादचा बुरखा फाडणारच... असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर, मराठमोळा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नाव न घेता, शाहीर साबळे यांच्यावरील चरित्रपटाची आठवण नेतेमंडळींना करुन दिली. शिंदे यांनी महाराष्ट्राचा शाहीर चित्रपटाकडे नेतेमंडळींचं लक्ष नसल्याची खंत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. आता, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केदार शिंदेंच्या ट्विटला रिप्लाय देत, हा सिनेमा मोफत दाखवण्यात येत असल्याचं जाहीर केलं.
नेते मतांसाठी चित्रपट बनवायला सांगतात आणि फुकटात दाखवतातही. द्वेश .. आग … मत… ह्यासाठी पाहिजे ते. आम्ही ठाण्यात प्रभात टॉकिजला महाराष्ट्र शाहीर ह्या चित्रपटाचा शुक्रवार, शनिवार, रविवारी संध्याकाळी ७ वाजताचा शो लावला आहे. जाहीर आमंत्रण … मराठी वर प्रेम करणाऱ्या प्रत्यकासाठी हा शो विनामूल्य आहे. आपले संस्कार, संस्कृति आणि इतिहास आपल्याला माहीत असायलाच हवा , असे म्हणत आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांना मेन्शन केलंय.
खास मराठी जनांसाठी खास मराठी चित्रपट "महाराष्ट्र शाहीर"चे विशेष आयोजन ठाणे प्रभात टॉकीज जिथे निळू फुले,डॉ.श्रीराम लागू यांच्यापासून थेट नाना पाटेकर यांच्यासारख्या दिग्गज मराठी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होत त्याचं ठिकाणी शुक्रवार शनिवार रविवार संध्याकाळी ठीक ७ वाजता विनामुल्य pic.twitter.com/VmmxWq1VZb
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 9, 2023
काय म्हणाले होते केदार शिंदे
“दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?”, असे ट्विट केदार शिंदे यांनी केले होते.