जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना साडेसात लाख पुस्तकांचे मोफत वाटप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:23+5:302021-08-21T04:45:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील अनुदानित, शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या एक हजार ५०० शाळांमधील एक लाख ६० हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील अनुदानित, शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या एक हजार ५०० शाळांमधील एक लाख ६० हजार ४२० विद्यार्थ्यांना यंदा मोफत पुस्तके वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना आठ लाख ५९ हजार ८०५ पुस्तके मोफत वाटप होणार आहेत. यापैकी गुरुवारी सात लाख ३९ हजार ६५७ पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र बालभारतीची म्हणजे मराठीची एकात्मिकतेची एक लाख २० हजार पुस्तके अद्याप भिवंडीतील बालकांना मिळालेली नाहीत.
पालकांना विश्वासात घेऊन शिक्षकांनी मुलांची शाळेत काळजी घेत शिकवण्यास प्रारंभ केलेला आहे. त्यांना या मोफत पुस्तकांचा लाभ आधीच मिळणे अपेक्षित होते; पण गुरुवारी जिल्ह्यातील या एक लाख ६० हजार ४२० विद्यार्थ्यांना सात लाख ३९ हजार ६५७ पुस्तके त्या त्या तालुक्यात पोहोच झाली आहेत. यामध्ये मुरबाड, शहापूर, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील सर्व शाळांना आता १०० टक्के पुस्तके वाटप झाल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. यामध्ये मराठीच्या बालभारती, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल आदी सर्व पुस्तकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या एक हजार ३२८ शाळांसह नगर परिषदांच्या ३४ शाळा, शासकीय शाळा ३१ आणि उर्वरित ४ टक्के अनुदानित शाळा अशा सर्व शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना या मोफत पुस्तकांचा लाभ दिला जात आहे. जिल्ह्यात पहिली ते पाचवीचे ९४ हजार ११७ विद्यार्थी आहेत. याशिवाय ६६ हजार ३०३ विद्यार्थी सहावी ते ८ वीच्या वर्गातील आहेत. या विद्यार्थ्यांना आठ लाख ५९ हजार ८०५ पुस्तकांचे वाटप होणार आहे. यापैकी आता सात लाख ३९ हजार ६५७ पुस्तके शाळांना पोहोचली आहेत. पाच तालुक्यांपैकी आता फक्त भिवंडी तालुक्यातील इतर माध्यमांची ७४ हजार पुस्तके आलेली आहेत. उर्वरित एक लाख २० हजार एकात्मिक म्हणजे बालभारतीची पुस्तके अद्याप आलेली नाही.