मीरा भाईंदर महापालिकेकडून शेतकऱ्यांना कंपोस्ट खताचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 09:47 PM2018-01-01T21:47:06+5:302018-01-01T21:47:41+5:30
पालिका उद्यानां मधील पालापाचोळा तसेच ओल्या कचरया पासुन तयार केलेल्या कंपोस्ट खताचे शेतकरयांना मोफत वाटप करण्याचा अभिनव उपक्रम मीरा भाईंदर महापालिकेने सुरु केलाय.
धीरज परब
मीरारोड - पालिका उद्यानां मधील पालापाचोळा तसेच ओल्या कचरया पासुन तयार केलेल्या कंपोस्ट खताचे शेतकरयांना मोफत वाटप करण्याचा अभिनव उपक्रम मीरा भाईंदर महापालिकेने सुरु केलाय. आज नववर्षाच्या सुरवातीला पालिकेने शेतकरयांना ५०० किलो कंपोस्ट खताचे मोफत वाटप केले. शिवाय गृहनिर्माण संस्थांनी कंपोस्ट खत प्रकल्प उभारल्यास त्यांना मालमत्ता करात सवलत दिली जाणार आहे.
मीरा भार्इंदर महापालिकेने जेसल पार्क, सुभाषचंद्र बोस मैदान, नवघर आदी ४ ते ५ ठिकाणी ओल्या कचरया पासुन कंपोस्ट खत तयार करण्याचे छोटे छोटे प्रकल्प सुरु केले आहेत. उरलेल्या भाज्या, भाज्यांचा कचरा याच बरोबर झाडं - रोपांचा पालापाचोळा या पासुन कंपोस्ट खत तयार केले जात आहे.
पालिकेच्या या छोट्या छोट्या खत प्रकल्पातुन मिळालेल्या कंपोस्ट खताचे शेतकरयांना मोफत वाटप करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी घेतला आहे.
आज सोमवारी नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ( नगरभवन) येथे पालिकेने शेतकरयांना मोफत खत वाटपचा उपक्रम सुरु केला. मुर्धा, राई, मोर्वा तसेच अर्नाळ येथील शेतकरी असलेले निळकंठ भोईर, चंद्रश पाटील, चंद्रकांत राऊत, जयकिशन पाटील, कमलेश पाटील, भावेश पाटील, सुनिल पाटील, दिनेश भोईर, लिलाधर पाटील, प्रशांत म्हात्रे, राजेश पाटील, मंगेश पाटील, रमेश पाटील आदिंना कंपोस्ट खताचे वाटप करण्यात आले.
उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उद्यान अधिक्षक नागेश विरकर आदिंनी शेतकरयांना खत वाटप केले. सुमारे ५०० किलो कंपोस्ट खताचे मोफत वाटप या वेळी करण्यात आले.
शेतकरयांचा सात बारा उतारा पाहुन तसेच त्याची निकड पाहुन मोफत खत दिले जाणार आहे. या पुढे मीरा भार्इंदर मधील शेतकरयांनाच खत दिले जाईल. कंपोस्ट खताचा फायदा शेतकरी, बागायतदार यांना मिळावा. त्यांनी शेतातील पालापाचोळा जाळुन न टाकता खत प्रकल्पासाठी त्याचा वापर करावा म्हणुन प्रोत्साहन देण्याची पालिकेची भुमिका आहे. शेतकरयांना त्यांच्या पिक वा लागवडीसाठी सेंद्रिय खताच वापरा मुळे होणारे फायदे यातुन कळतील.
शेतकरयां सोबतच गृहनिर्माण संस्थांना सुध्दा कंपोस्ट खत प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतीतील रहिवाशांचा ओला कचरा, पाला पाचोळा याची विल्हेवाट त्यांच्याच इमारतीच्या आवारात केल्यास मालमत्ता करात सवलत दिली जाणार आहे असे डॉ. पानपट्टे म्हणाले.
महापालिकेच्या उद्यानां मध्ये निर्माण होणारा रोजचा पाला पाचोळा व ओला कचरा याच्या पासुन देखील खत तयार केले जाणार आहे. पालिकेच्या २२ उद्यानां मध्ये कंपोस्ट खत प्रकल्प तयार करायला घेतले आहेत. यातुन आणखी मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध होणार आहे. सदर खत शेतरयांना मोफत देण्यास पालिकेच्या रोपं, झाडांना सुध्दा वापरले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
गृहनिर्माण संस्था, उद्यानं, शेती, बागायती आदि ठिकाणी निर्माण होणारया ओल्या कचरयाची विल्हेवाट त्या त्या ठिकाणीच लावण्यासाठी प्रोत्साहन देतानाच कंपोस्ट खताचे उत्पादन करण्यासाठी पालिका व्यापक मोहिम हाती घेणार असल्याचे डॉ. पानपट्टे यांनी सांगीतले.