कल्याण-डोंबिवलीतील नव्या रिक्षांसाठीच्या इरादापत्रास विनामूल्य मुदतवाढ मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 06:12 PM2017-12-07T18:12:23+5:302017-12-07T18:17:31+5:30
ज्या रिक्षा चालकांना इरादा पत्र मिळाले आहे, त्यांना वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्यापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात इरादापत्राची मुदत ही सहा महिन्यांची असते, ती संपण्याची वेळ आता जवळ येत आहे. पण अनेकांनी रिक्षा घेतलेल्या नाहीत, त्या मुदतीत विनामूल्य वाढ करावी अशी मागणी युनियनने केली आहे.
डोंबिवली: मागेल त्याला परमीट (इरादा पत्र) या राज्य शासनाच्या बेरोजगारी कमी करण्यासाठीच्या उपक्रमाचे डोंबिवली रिक्षा चालक मालक युनियनने अभिनंद केले, पण ज्या रिक्षा चालकांना इरादा पत्र मिळाले आहे, त्यांना वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्यापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात इरादापत्राची मुदत ही सहा महिन्यांची असते, ती संपण्याची वेळ आता जवळ येत आहे. पण अनेकांनी रिक्षा घेतलेल्या नाहीत, त्या मुदतीत विनामूल्य वाढ करावी अशी मागणी युनियनने केली आहे.
यासंदर्भात संस्थेचे उपाध्यक्ष शेखर जोशी, कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे, सचिव भिकाजी झाडे आदींनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांना त्यासंदर्भात गुरुवारी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी इरादापत्र मिळाले असले तरी संबंधित लाभार्थ्यांना भेडसावणा-या असंख्य अडचणींमुळे अनेकांनी वाहने घेतलेली नाहीत. इरादापत्राची मुदत ही सहा महिने असते. त्यामुळे इरादापत्र मिळाल्यापासून सहा महिन्यात वाहन खरेदी करुन त्याचे आरटीओकडुन पासिंग करुन घेणे बंधनकारक असते. पण अनेकांकडे कर्ज घेण्यासाठी जी अनामत रक्कम असते ती नसणे, कर्जाच्या बदल्यात रिक्षा या सुविधेत वाहने उपलब्ध नसणे, विविध ठिकाणच्या शोरुममध्ये रिक्षा उपलब्ध नसणे अशा विविध तांत्रिक अडचणींना संबंधित लाभार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मागणी आणि तसा पुरवठा बाजारात होत नसल्याने अनेकांना इरादापत्र रद्द होणार असल्याचे दडपण आहे. त्यासाठी परिवहन विभागाने युननियची मागणी तातडीने मान्य करावी आणि हजारो इरादापत्र धारकांना दिलासा द्यावा असे साकडे जोशी यांनी परिवहन अधिका-यांना घातले.