पालिकाच्या 250 कर्मचाऱ्यांची होणार मोफत आरोग्य तपासणी
By पंकज पाटील | Published: October 2, 2022 04:49 PM2022-10-02T16:49:45+5:302022-10-02T16:50:38+5:30
जागतिक हृदय दिना निम्मित रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी व माधवबाग क्लिनिक बदलापूर पूर्व यांच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत ही तपासणी केली जाणार आहे.
बदलापूर - रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अडीचशे कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार येत्या १५ दिवसांत ही तपासणी केली जाणार आहे.
जागतिक हृदय दिना निम्मित रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी व माधवबाग क्लिनिक बदलापूर पूर्व यांच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत ही तपासणी केली जाणार आहे. माधवबाग बदलापूर क्लिनिकच्या माध्यमातून पुढील पंधरा दिवस पालिकेच्या सुमारे दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांचे ईसीजी, ब्लड पेशर, सीबीसी, आरबीएस, पीपी, आणि रक्तामधील सीबीसी तपासणी करून त्यांना डॉक्टरांचे यावर मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.
दररोज सुमारे पंधरा ते वीस कर्मचाऱ्यांची त्यांच्या सोयीनुसार तपासणी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात रोटरीच्या कामाचे कौतुक करून आगामी काळातही पालिका रोटरीसोबत उपक्रम राबवणार असल्याचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितले. डॉ.अर्चना शिकलगार व डॉ. स्मिता झामरे यांनी हृदयाची काळजी याविषयी प्रोजेक्टर वर विविध स्लाईड च्या माध्यमातून व्याख्यान दिले.आपल्या हृदयाची आपण काळजी कशी घ्यावी याबाबतच्या उपाययोजना त्यांनी यावेळी सांगितल्या.