बारावे घनकचरा प्रकल्पाचा मार्ग मोकळा, हरित लवादाने उठवली स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 05:50 AM2018-10-05T05:50:46+5:302018-10-05T05:51:10+5:30
हरित लवादाने उठवली स्थगिती : पोलीस बंदोबस्तात काम सुरू
कल्याण : केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पास राष्ट्रीय हरित लवादाने ‘जैसे थे’चे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश लवादाने शिथिल केले आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बारावे येथे तीन हेक्टर जागेवर कचऱ्यापासून खत आणि भरावभूमी क्षेत्र प्रकल्प उभारण्यासाठी २०१६ मध्ये निविदा महापालिकेने काढली होती. सौराष्ट्र कंपनीची १६ कोटींची निविदा मंजूर होताच कार्यादेश दिला गेला.
२०१७ मध्ये पर्यावरण विभागाकडून नाहरकत दाखला मिळवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील होती. ६ जूनला हा दाखला मिळाला. मात्र, बारावे येथील एका नागरिकाने हरित लवादाकडे दाद मागितली. त्यामुळे लवादाने महापालिकेस ‘जैसे थे’चे आदेश दिले होते. यासंदर्भात दोन सुनावण्या झाल्यानंतर ‘जैसे थे’चे आदेश शिथिल केल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाने दिली आहे. परंतु, या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यास चार आठवड्यांत पर्यावरण विभागाकडे दाद मागता येईल, अशी मुभा लवादाने दिली आहे. मात्र, स्थगिती हटल्याने आता सौराष्ट्र कंपनीला काम सुरू करता येणार आहे.
दुसरीकडे महापालिकेने गोदरेज कंपनीच्या नऊ कोटी रुपयांच्या सीएसआर फंडातून कचºयापासून सीएनजी गॅस प्रकल्प आणि प्लास्टिक रॅपरपासून तेल तयार करण्याचे प्रकल्प उभारले आहेत. सध्या तेलाच्या प्रकल्पाचा रिअॅक्टर बसवण्याचे काम सुरू आहे. रिअॅक्टरची किंमत एक कोटी आठ लाख रुपये आहे. याशिवाय, काही कचरा जाळून त्याच्या राखेपासून विटा तयार केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्लास्टिक कचºयावर पुनर्प्रक्रिया करून त्याचे दाणे तयार केले जाणार आहेत.
कंपनी हे सर्व प्रकल्प १० वर्षे चालवणार आहे. ओल्या, सुक्या कचºयाचे वर्गीकरण करण्याचीही तयारी कंपनीने दाखवली आहे. स्थानिकांनी दोन महिन्यांपूर्वी प्रकल्पाला विरोध करत त्याचे काम बंद पाडले होते. आता ते पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू झाले आहे. गोदरेजचा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित होऊन सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागू शकतो, अशी माहिती घनकचरा विभागाचे अभियंता मिलिंद गायकवाड यांनी दिली.
कामाला
गती द्या
उंबर्डे, बारावे आणि आधारवाडी येथील घनकचरा प्रकल्पांच्या कामाची पाहणी गुरुवारी शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी केली. उंबर्डे व बारावे प्रकल्पांतील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या कामाला गती द्या, अशा सूचना राणे यांनी घनकचरा विभागाच्या अधिकारीवर्गास दिल्या आहेत.