१०० रुपयांत दहा वर्षे मोफत वायफाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:59 AM2017-09-01T00:59:13+5:302017-09-01T10:10:21+5:30
१00 रुपयात नावनोंदणी करून मोफत वायफाय सेवेचा लाभ ठाणेकरांना लवकरच मिळणार आहे. ठाणे महापालिका या योजनेवर काम करीत असून, पहिल्या टप्प्यात शहरातील काही भागात ही सेवा सुरू केली जाणार आहे.
ठाणे : १00 रुपयात नावनोंदणी करून मोफत वायफाय सेवेचा लाभ ठाणेकरांना लवकरच मिळणार आहे. ठाणे महापालिका या योजनेवर काम करीत असून, पहिल्या टप्प्यात शहरातील काही भागात ही सेवा सुरू केली जाणार आहे.
ठामपाने पुढील १0 वर्षांसाठी शहरवासियांना मोफत वायफाय सेवा देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी नागरिकांना महापालिकेकडे १00 रुपये शुल्क भरून नावनोंदणी करावी लागणार आहे. नावनोंदणी केलेल्या ठाणेकरांना ८00 केबीपीएस डेटा मोफत वापरण्यास मिळेल. यापेक्षा जास्त डेटा आवश्यक असल्यास नागरिकांना महापालिकेकडे वेगळे शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय महापालिकेच्या सर्व कार्यालयांना २0 एमबीपीएस डेटा या सेवेअंतर्गत मोफत पुरविला जाणार आहे. या योजनेतून महापालिकेस वर्षाकाठी ६१ लाखांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब आॅफ ठाणे लेक सिटी आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथील महापालिकेच्या शाळा क्र. ९ जवळ दिव्यांगांसाठी सारथी संसाधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी त्याचे उद्घाटन झाले. त्याला नॅबचे (अंधांसाठीची राष्ट्रीय संघटना) सहकार्य मिळणार असून ठाणे परिसरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. विकास केंद्रात दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यास केंद्र राहील, अत्याधुनिक शैक्षणिक सॉफ्टवेअर, आॅडिओ लायब्ररी आणि संगणक प्रशिक्षण तसेच ब्रेल लिपीमध्ये पुस्तके उपलब्ध असतील. पुढच्या टप्प्यात या केंद्रामध्ये दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी सुटीच्या कालावधीत विशेष अभ्यासक्रम, तसेच रोजगार केंद्राची सुविधाही उपलब्ध होणार आहे. ठाण्यात अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र असून, दिव्यांगांसाठी हे उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला.