मीरारोड: स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन कोळी यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 06:53 PM2022-01-30T18:53:52+5:302022-01-30T18:55:17+5:30

स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देणारे भाईंदरच्या उत्तन येथील स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन मानवेल बांड्या - कोळी यांचे निधन झाले.

freedom fighter agustin koli dies at 102 in mira road | मीरारोड: स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन कोळी यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन 

मीरारोड: स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन कोळी यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -  स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देणारे भाईंदरच्या उत्तन येथील स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन मानवेल बांड्या - कोळी यांचे रविवारी पहाटे दिड च्या सुमारास निधन झाले . ते १०२ वर्षांचे होते . उत्तनचर्च येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . 

१ जानेवारी १९२० रोजी आगुस्तिन यांचा जन्म उत्तन गावात झाला . त्यांचे प्राथमिक शिक्षण त्याकाळच्या लोकल बोर्डाच्या मराठी शाळेत झाले . पुढील शिक्षण त्यांनी वसई व मुंबईत केले . ७ वी ते ११ वी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण त्यांनी वसईच्या पापडी येथील त्या काळच्या नालंदा विद्यालय  मध्ये पूर्ण केले . त्याकाळच्या बॉम्बे -  बरोडा भारतीय रेल्वेत त्यांना नोकरी मिळाली . परंतु स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली तसे ते सुद्धा सरकारी नोकरी मुळे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता येत नसल्याने अस्वस्थ होऊ लागले . देशासाठी स्वतःच्या सरकारी नोकरी व चांगल्या पगारासह कुटुंबीयांचा विचार न करता १९४० साली आगुस्तिन यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ते उघडपणे स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले . 

अरबी समुद्र किनारी वसलेले मच्छिमार व शेतकऱ्यांचे गावखेडे असलेले उत्तन व परिसर १५ व्या शतकात पोर्तुगिझांच्या व त्या नंतर १६ व्या शतका पासून इंग्रजांच्या प्रभावा खाली होते .  यामुळे उत्तन गावातून स्वातंत्र्याचा लढा सुरु करणे सहज सोपे नसल्याने त्यांनी मुंबई , दहिसर , पाणजू बेट, वसई भागातून स्वातंत्र्याचा लढा चालवला.  १५ जानेवारी १९४१ रोजी उत्तन तलाठी कार्यालय जवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिली उत्स्फूर्त जाहीर सभा झाली . आगुस्तिन यांना अटक व कारावास सुद्धा भोगावा लागला . 

स्वातंत्र्य मिळाल्या नंतर त्यांनी उत्तन सारख्या गावखेड्यात शिक्षणाची पाळेमुळे रुजवण्यास सुरवात केली . ते स्वतः ३० वर्ष उत्तनच्या संत जोसेफ शाळेत शिक्षक म्हणून सक्रिय राहिले . ते शाळेत संस्कृत आदी विषय शिकवत असत . मच्छिमारांनी शिक्षण व वाचना कडे वळावे म्हणून त्यांनी तरंगते वाचनालय अशी संकल्पना राबवली . मासेमारी साठी समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांना वाचण्यासाठी ते विविध पुस्तके एका पेटीतून देत असत . उत्तन गावचे ते तब्बल १७ वर्ष सरपंच म्हणून ते कार्यरत होते . १० वर्ष ठाणे तालुका पंचायत समिती चे ते उपसभापती होते . दुर्बल घटकांचे प्रतिनिधी म्हणून १० वर्षे ते सिटीझन बँकेचे संचालक राहिले . वासरू लघु उधोग संस्थेच्या स्थापनेत त्यांचा देखील पुढाकार होता . उत्तन परिसराच्या विकासासह त्यांनी मच्छिमार - शेतकऱ्यांना  शिक्षण , स्वयंरोजगारा कडे प्रोत्साहित करण्यासाठी सतत प्रयत्न केले . 

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या वयाचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला होता .  त्यावेळी देखील त्यांनी खणखणीत आवाजात उपस्थितांना मार्गदर्शन केले होते . 

गेले दोन दिवस त्यांना कफ झाला होता . शनिवारी ते गुणगुणत होते व नेहमी प्रमाणेच त्यांची दिनचर्या होती . कफ मुळे प्रकृती काहीशी बिघडली होती . रविवार ३० जानेवारीच्या पहाटे दिड च्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शोकाकुल वातावरण झाले . त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या घरी आणि दुपारी उत्तन चर्च येथे जमले होते . उत्तन पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली . आमदार गीता जैन , माजी खासदार मिठालाल जैन , मच्छिमार नेते लिओ कोलासो , नगरसेविका शर्मिला गंडोली , एलायस बांड्या , एड . शफिक खान , काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत , आदींसह विविध क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत आदरांजली वाहिली . त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा परिवार आहे .
 

Web Title: freedom fighter agustin koli dies at 102 in mira road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.