नवघर येथे साकारणार स्वातंत्र्य सैनिक स्मारक, पाकिकेच्या सभेत ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 06:44 PM2018-02-27T18:44:29+5:302018-02-27T18:44:29+5:30
पुर्वेकडील नवघर नाका येथे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक बांधण्याचा ठराव गेल्या अनेक वर्षानंर पहिल्यांदाच २६ फेब्रुवारीच्या महासभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आला. त्यात शहरातील ३८ स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरण्यात येणार असल्याने त्यांची ओळख आहे.
- राजू काळे
भार्इंदर - पुर्वेकडील नवघर नाका येथे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक बांधण्याचा ठराव गेल्या अनेक वर्षानंर पहिल्यांदाच २६ फेब्रुवारीच्या महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यात शहरातील ३८ स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरण्यात येणार असल्याने त्यांची ओळख स्थानिकांना होणार आहे.
भार्इंदर पुर्वेकडील नवघर व गोडदेव गावात मोठ्याप्रमाणात लोकवस्तींची घनता आहे. पुर्वी या ठिकाणी मोठ्याप्रमाणात भात शेती होत होती. नवघर गावालाच लागून भार्इंदर खाडी असल्याने त्यातील पाणी शेतात येऊन शेताचे नुकसान होऊ नये, यासाठी इग्रजांनी दि इस्टेट इन्वेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातुन स्थानिक रहिवाशी लक्ष्मणजी यांना बांध बंदिस्ताकरीता नियुक्त केले होते. त्यापोटी इंग्रजांना शेतसारा वसुल करुन देण्याची जबाबदारी देखील त्यांनाच देण्यात आली होती. पुढे याच दि इस्टेट इन्वेस्टमेंट कंपनीने शहरातील सुमारे ३ हजार ६०० एकर जमीनीवर मालकी हक्काचा दावा कायम ठेवल्याने तो निकाली काढण्यासाठी स्थानिकांसह राजकीय मंडळी तसेच राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. सध्या हा खटला सर्वाेच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मराठा राजवटीपासुन पोर्तुगीज ते इंग्रज राजवटीचा इतिहास लाभलेल्या मीरा-भार्इंदरमधील या शहरात अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्यात ग्रामस्थ दामोदर सखाराम पाटील, जगन्नाथ पांडुरंग पाटील, जयराम शिवराम पाटील, पांडुरंग कालिदास पाटील, रामचंद्र बाळकृष्ण पाटील, दादू शिनवार पाटील (सर्व राहणार नवघर), नारायण केशव म्हात्रे, गोविंद उदय््राा पाटील, बाळू पाटील (सर्व राहणार गोडदेव) यांनी जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला होता. आनंदराव दामाजी पाटील, भास्कर दामाजी पाटील, पांडूरंग नानाजी गावंड (सर्व राहणार नवघर) यांनी वैयक्तिक सत्याग्रहात सहभाग घेतला होता. तर मोरेश्वर नारायण पाटील, नारायण आनंदराव पाटील, भास्कर कमलाकर पाटील, चिंतामण पांडुरंग पाटील, रामचंद्र पांडुरंग पाटील, हरिश्चंद्र गणपत पाटील, अनंत कालिदास पाटील, देवराव बाबूल पाटील, गंगाबाई आत्माराम पाटील, शंकर विठ्ठल पाटील, श्यामराव गोविंद पाटील, गोपिनाथ रामचंद्र पाटील, कमलाकर बाबाजी पाटील, जनार्दन वामन पाटील, गोपाळ दामोदर पाटील, महादेव नाना भोईर, आत्माराम राजाराम भोईर, नारायण लक्ष्मण पाटील (सर्व राहणार नवघर), यशवंत शंकर म्हात्रे (रा. घोडबंदर), भालचंद्र आनंदराव रकवी, नानु आनंदराव रकवी, हरेश्वर दिनानाथ पाटील, दुर्गा देसाई, बाळकृष्ण नारायण पाटील, कान्हा वालजी पाटील (सर्व राहणार भार्इंदर) व उत्तन येथील कोळी यांनी १९४२ मधील चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता. यातील बहुतांशी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या जागा पालिकेला लोकहितासाठी दान दिल्या असुन यातील बहुतांशी स्वातंत्र्य सैनिक सध्या ह्यात नाहीत. मात्र त्यांची ओळख सुमारे ९० टक्यांहुन अधिक मीरा-भार्इंदरकरांना नसल्याने त्यांचे हौतात्म्य व योगदान वाया जाऊ नये, ते नेहमी स्मरणात रहावे, यासाठी त्यांचे स्मारक साकारण्याकरीता भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी २६ फेब्रुवारीच्या महासभेत मांडला होता. तसेच यातील सुमारे २७ स्वातंत्र्य सैनिक एकट्या नवघर व लगतच्या गोडदेव गावातील असल्याने त्यांचे नवघर येथे स्मारक साकारण्याची मागणी करण्यात आली होती, ती सर्वानुमते मंजूर करण्यात आली.