एमआयडीसीतील भूखंड फ्रीहोल्ड करा
By Admin | Published: May 11, 2017 01:50 AM2017-05-11T01:50:21+5:302017-05-11T01:50:21+5:30
एमआयडीसी निवासी भागातील भूखंड फ्रीहोल्ड करावेत, अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील भूखंड फ्रीहोल्ड करावेत, अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.
शहरातील एमआयडीसीचे निवासी क्षेत्र १०० हेक्टर जागेवर आहे. येथे ४०० गृहनिर्माण सोसायट्या, तर ३०० बंगले आहेत. शाळा, कॉलेज, रुग्णालये, सरकारी कार्यालये, मंगल कार्यालयेही आहेत. हे सगळे ९५ वर्षांच्या भाडेपट्टे करारावर देण्यात आले आहे. क्रीडांगणे, शैक्षणिक संस्था यांना भूखंड १० वर्षे भाडेपट्टे कराराने दिले आहेत. राज्य सरकारने नुकतेच नवी मुंबईतील सिडकोचे भूखंड फ्रीहोल्ड केले आहेत. त्याच धर्तीवर डोंबिवली निवासी भागातील भूखंड फ्रीहोल्ड करावेत, अशी मागणी नलावडे यांनी केली आहे.
भूखंड फ्रीहोल्ड केल्यास भूखंड व सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न निकाली निघेल. अंतिम भाडेकरार पद्धत रद्द होईल. रहिवाशांना त्यांच्या इमारती व घर यांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी कर्ज मिळवणे सोयीचे होईल. यातून एमआयडीसीला महसुली रक्कम मिळेल. त्यातून कर्मचाऱ्यांवरील खर्च वाचेल, अशी सूचनाही नलावडे यांनी केली आहे.