प्रवासी वाहतुकीसोबत लालपरीतून मालवाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:44 AM2020-08-14T00:44:35+5:302020-08-14T00:44:59+5:30
तोटा भरून काढणार; एसटी महामंडळाने शोधला पर्याय, वाडा येथून एक मालवाहतूक बस रवाना
वाडा : कोरोना काळात एसटीची सेवा खंडित झाल्यामुळे महामंडळ तोट्यात आले असून कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले आहेत. परिणामी काही कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तोट्यात असलेल्या महामंडळाने पर्याय म्हणून आता चक्क शासकीय व खासगी मालवाहतूक सेवाही सुरू केली आहे. गुरूवारी दुपारी वाडा येथील धान्य गोदामातून बसमध्ये धान्य भरून धान्य दुकानात पाठविण्यात आले.
कोरोना काळात गेली पाच महिने एसटी बससेवा बंद असल्याने हजारो चालक-वाहक घरी आहेत. त्यातच आता किरकोळ प्रमाणात बससेवा सुरू केली असली तरी सद्यस्थितीत बसमध्ये प्रवासी संख्या कमी असते. त्यामुळे आणखी किती काळाने बससेवा सुरळीत होईल सांगता येत नसल्याने एसटी महामंडळ अडचणीत आले आहे. कर्मचाºयांचे पगार अडकले आहेत. यावर तोडगा म्हणून एसटी महामंडळाने आता प्रवासी सेवेबरोबर माल वाहतूकही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने एसटी आगारातील जुन्या बसेसमध्ये बदल करून आतील सर्व शीट काढून मागे मोठा दरवाजा करून खास माल वाहतुकीसाठी गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. या बसेसमधून शासकीय व खाजगी मालवाहतूक करणार असून महामंडळाने झालेला तोटा भरून काढण्यासाठी अशाप्रकारे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.
वाडा आगारात सद्य:स्थितीत एक मालवाहतूक बस तयार करण्यात आली असून त्यामधून माल वाहतूक सुरू केली आहे. यापुढे आणखी सहा बसेस माल वाहतुकीसाठी तयार करण्यात येणार आहेत.
- मधुकर धांगडा, आगारप्रमुख,
वाडा आगार