वारंवार होतोय वीजपुरवठा खंडित, वीजबिले न भरण्याचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:46 AM2019-07-17T00:46:49+5:302019-07-17T06:47:08+5:30
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याप्रकरणी येथील पूर्वेकडील रामनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह सोमवारी एमआयडीसीतील महावितरण कार्यालयात धडक दिली.
डोंबिवली : वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याप्रकरणी येथील पूर्वेकडील रामनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह सोमवारी एमआयडीसीतील महावितरण कार्यालयात धडक दिली. वीजसमस्येबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास २४ जुलैपासून विजेची बिले भरली जाणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.
पूर्वेकडील रामनगर, उर्सेकरवाडी, शिवमार्केट, म्हात्रेनगर, आयरेगाव आदी परिसरात अडीच महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सतत खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी याबाबतची तक्रार, मनसेचे स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांच्याकडे केली होती. अधिकाºयांशी संपर्क साधूनही वीजपुरवठ्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याप्रकरणी सोमवारी हळबे यांच्यासह मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, विशाल बढे, प्रथमेश खरात, प्रकाश थोरात, सागर तांबे, समीर भोर आदी पदाधिकाºयांनी हेमंत ताम्हाणे, नरेश खेडेकर, संदीप पाटील, राजन गाला, प्रकाश हिंगणे, सुशील सामंत आदी रहिवाशांना घेऊन एमआयडीसीतील महावितरणचे कार्यालय गाठले आणि वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याबाबत विचारणा केली. यावेळी कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्याशी चर्चा करण्यात आली. देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागत असल्याचे कारण यावेळी बिक्कड यांनी दिले. यावर आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळित न झाल्यास विजेची बिले भरणार नाही, असा इशारा मनसेने दिला.
>शुक्रवारी विशेष मोहीम
दोन एजन्सींमार्फत देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. रामनगर आणि अन्य परिसरातील वीजपुरवठा खंडित होत असलेल्या तक्रारीसंदर्भात शुक्रवारी विशेष मोहीम राबवून तक्रारीचा निपटारा केला जाईल, असे आश्वासन रहिवासी आणि मनसेच्या पदाधिकाºयांना कार्यकारी अभियंता बिक्कड यांनी दिले.