आता वारंवार वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर होणार जबर दंडाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 08:24 PM2021-12-13T20:24:05+5:302021-12-13T20:33:33+5:30

तब्बल १४० कलमांच्या कारवाईला ठाण्यात सुरुवात

Frequent traffic offenders will now face severe penalties | आता वारंवार वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर होणार जबर दंडाची कारवाई

आता वारंवार वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर होणार जबर दंडाची कारवाई

Next

ठाणे: ठाणे यापुढे मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध दंडाच्या रकमेत वाढ झाली आहे. त्यामुळे ११ डिसेंबर (मध्यरात्री) पासून नविन दंड आकारणी सुरु केल्याची माहिती ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी दिली. त्यामुळे आता अनधिकृत वाहन चालकाला पूर्वीच्या दोनशे रुपयांऐवजी थेट पाच हजार रुपये तर वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणाऱ्याला दोनशे रुपयांऐवजी एक हजार ते दहा हजारांचा दंड मोजावा लागणार आहे. त्यामुळेच वाहतूकीचे नियम न मोडण्याचे आवाहनही उपायुक्त पाटील यांनी केले आहे.

नविन मोटार वाहन सुधारणा अधिनियम २०१९ अन्वये मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे. सुधारित अधिनियमानुसार ई-चलन प्रणालीमध्ये ११ डिसेंबर २०२१ रोजीच्या मध्यरात्रीपासून ही नवीन दंड आकारणी सुरु झाली आहे. यामध्ये विविध १९४ कलमांचा समावेश आहे. त्यापैकी ५४ कलमे ही तडजोड न करता येणारी असून १४० कलमे ही तडजोड योग्य आहेत. तडजोड योग्य सर्व कलमान्वये कारवाई सुरु केली असून एकापेक्षा अधिक वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंडाची रक्कम ही मशिनद्वारे आपोआप आकरली जाणार असल्याचेही उपायुक्त पाटील यांनी सांगितले.

या नविन नियमानुसार पोलिसांचा आदेश नाकारल्यास पूर्वीच्या दोनशे रुपयांऐवजी सुरुवातीला पाचशे त्यानंतर दीड हजारांचा दंड घेतला जाणार आहे. विना लायसन्स आणि परवाना संपूनही वाहन चालविल्यास पाचशे ऐवजी थेट पाच हजारांचा दंड आकारणी होईल. तर वाहनांची शर्यत लावणा:यांना सुरुवातीला पाच हजार तर दुस:यांदा दहा हजार रुपयांचा फटका बसणार आहे. वाहनाचा वीमा नसल्यास दोनशे ऐवजी आधी दोन हजार नंतर चार हजार आकारणी होईल. 

वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवरही आता एक हजारांऐवजी दुचाकी आणि तीन चाकी एक हजार, ट्रॅक्टर- दीड हजार आणि लहान वाहने चार हजारांचा दंड होणार आहे. याशिवाय, विना हेल्मेट दुचाकीस्वारांनाही पाचशे ऐवजी सुरुवातीला पाचशे दुसऱ्यांदा दीड हजार दंड बसणार आहे. याशिवाय, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणाऱ्यांनाही आता दोनशे ऐवजी दुचाकीधारकाला सुरुवातीला एक हजार, तीन चाकी दोन हजार, जड वाहन चार हजार तर दुस:यांदा पकडल्यास दहा हजारांचा दंड भरण्याची नामूष्की ओढवणार आहे.

''वाहतूकीचे नियम मोडल्यामुळे अपघातांची संख्या वाढून जिवितहानी होते. रस्त्यावरील प्रत्येक चूक ही प्राणघातक ठरू लागली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी स्वत:सह आपल्या कुटूंबियांचा तसच इतर वाहन धारकांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी घ्यावी. अन्यथा वाढलेल्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे.''

-बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर

Web Title: Frequent traffic offenders will now face severe penalties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.