फेसबुकवरील मैत्रिणीने दिला दगा, तिघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 01:46 AM2019-11-14T01:46:27+5:302019-11-14T01:46:37+5:30
अंगावर सोने बाळगल्याने दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्याने अटक केली आहे.
डोंबिवली : अंगावर सोने बाळगल्याने दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्याने अटक केली आहे. त्यामुळे सुटका करण्यासाठी सीमा शुल्क भरण्याचा बहाणा करत फेसबुकवरील मैत्रिणीने एका ६८ वर्षांच्या वृद्धाला ६३ हजारांचा गंडा घातल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. आपल्या मैत्रिणीला सोडविण्यासाठी या वृद्धाने दागिनेही गहाण ठेवले.
पश्चिमेतील कैलासनगर परिसरातील नरेंद्र देसाई (६८) यांची फेसबुकद्वारे नॅन्सी विल्यम हिच्याशी ओळख झाली होती. ब्रिटिश एअरलाइन्सने दिल्ली विमानतळावर आल्याचा मेसेज विल्यमने मागील महिन्यात फेसबुकवर देसाई यांना पाठवला. अंगावर २१० ग्रॅम दागिने बाळगल्याने दिल्ली विमानतळावर जाधव नावाच्या महिला इमिग्रेशन आॅफिसरने अटक केल्याची बतावणी विल्यमने केली.
तसेच, अटक केल्यानंतर सोडविण्यासाठी सोन्याचे सीमा शुल्क भरण्यास सांगितल्याचेही विल्यम हिने देसाई यांना सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देसाई यांनी सोन्याचे दुकान असलेल्या आपल्या मित्राकडे आपले दागिने गहाण ठेवले. त्यानंतर, विल्यमने सांगितल्यानुसार नरेंद्र देसाई यांनी सीमा शर्मा
नावाच्या महिलेच्या खात्यावर आॅनलाइनद्वारे ६३ हजार रुपये पाठवले.
तसेच, जाधव हिच्याशी संपर्क साधून सीमा शुल्क भरल्याची पावती पाठविण्यास सांगितले. बराच कालावधी उलटूनही जाधव हिने पावती पाठवली नाही. त्यामुळे जाधव हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाºया देसाई यांना तिचा
मोबाइल बंद असल्याचे निदर्शनास आले.
आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आलेल्या देसाई यांनी मंगळवारी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विल्यम, जाधव आणि सीमाविरोधात गुन्हा दाखल के ला आहे.