मैत्रीच्या पालखीचे भोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 05:31 AM2018-01-05T05:31:19+5:302018-01-05T05:31:37+5:30

पहिल्याच भेटीत आपल्याला निखळ मैत्रीच्या नात्यात आणणारे वसंत डावखरे नावाचे अजब रसायन होते. कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने या माणसानं स्वत:ला घडवले. सामान्य परिस्थितीत पोटापाण्यासाठी चाकरी करण्यापासून नगरसेवक ते विधान परिषदेचे उपसभापतीपद एवढी मोठी मजल त्यांनी गाठली होती.

 The friend of the palanquin | मैत्रीच्या पालखीचे भोई

मैत्रीच्या पालखीचे भोई

googlenewsNext

- हेमंत टकले,
आमदार विधान परिषद, लेखक

पहिल्याच भेटीत आपल्याला निखळ मैत्रीच्या नात्यात आणणारे वसंत डावखरे नावाचे अजब रसायन होते. कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने या माणसानं स्वत:ला घडवले. सामान्य परिस्थितीत पोटापाण्यासाठी चाकरी करण्यापासून नगरसेवक ते विधान परिषदेचे उपसभापतीपद एवढी मोठी मजल त्यांनी गाठली होती. रूढअर्थाने अपेक्षित असलेले राजकारणही त्यांनी कौशल्याने हाताळले. ज्या महत्त्वाच्या पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळत गेली, त्या स्थानावरून गोरगरिबांच्या, कष्टकºयांच्या हिताची जपणूक करण्याचा वसा त्यांनी अंगीकारला. राजकारण एके राजकारण हे सूत्र त्यांना कधीच बंधनात अडकवू शकलेले नाही. अत्यंत सहजतेने त्यांचा कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक कार्य ह्या सर्वांत वावर होता. माणसं जोडत जाणे, हा तर त्यांच्या जगण्याचा श्वास झाला. बरं हे सगळं दिखाऊ किंवा मोठेपणा मिरविण्यासाठी, प्रसिद्धीसाठी काहीतरी मिळविण्यासाठी कधीच नव्हते. एखाद्या गावाकडचा सामान्य परिस्थितीतला खेळाडू असेल, कलेच्या प्रांतात धडपड करणारा कुणी कलाकार असेल, परिस्थितीने भरडलेला कुणी अभागी असेल, सरकारी यंत्रणेकडून अन्याय झालेला कुणी पीडित असेल अशी असंख्य माणसे हक्काने आपली कैफियत घेऊन डावखरे साहेबांकडे यायची. माणसाची पारख करण्यात वसंतरावांचा हातखंडा होता. आलेल्या माणसाचे काम आपण केलेच पाहिजे, ह्या जाणिवेने मग ते पछाडलेले असत. ते काम होण्यासाठी अटीतटीची वेळ आली तरी ते मागे हटत नसत. काही वेळा येणारा माणूसही चूक करून आलेला असतो. त्याला अपराधीपणाची जाणही असते. पण, माणुसकी म्हणून त्याला पुन्हा संधी द्यायला हवी, ही वसंतरावांची भूमिका असायची. प्रसंगी त्याबद्दल त्यांना टीकेचा धनी व्हायाला लागले आहे. अनेक नेत्यांना लोक काय म्हणतील, ह्या यक्षप्रश्नाने ग्रासलेले असते. पण, वसंतरावांचं सूत्र पक्कं असायच. लोक म्हणायचे ते म्हणत राहतील, त्याची एवढी चिंता नको. माझ्या मनाला पटलं आणि योग्य वाटलं तर तो प्रश्न मी मार्गी लावणारच, हा निर्धार पक्का असायचा. त्यांची ऊठबस सगळ्या प्रमुख नेत्यांबरोबर स्रेहाची राहिली आणि कुणीही तर्कटपणाने त्याचे वेगळे अर्थ काढले नाहीत. सभागृहाच्या कामकाजात काही अटीतटीचे मुद्दे येतात, वातावरण संतप्त होते ह्या सर्वांवरचा रामबाण उपाय म्हणजे वसंत डावखरे हा परवलीचा शब्द झाला होता. तणाव कमी करणे, वातावरणात मार्मिक पण खुसखुशीत टिप्पणी करून हास्याची लहर निर्माण करणे हे त्यांचे कसब विलक्षण होते. असा हा अवलिया मित्र असणे म्हणजे खूप श्रीमंत आहोत, असे वाटायचे.

Web Title:  The friend of the palanquin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.