फेसबुकवरील मैत्री पडली महागात, कल्याणच्या विवाहितेवर ठाण्यात अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:23 AM2018-06-17T01:23:22+5:302018-06-17T01:23:22+5:30
फेसबुकची मैत्री कल्याण-मुरबाड रोड येथील चोवीसवर्षीय विवाहितेला चांगलीच महागात पडली आहे.
ठाणे : फेसबुकची मैत्री कल्याण-मुरबाड रोड येथील चोवीसवर्षीय विवाहितेला चांगलीच महागात पडली आहे. नोकरीचे आमिष दाखवून चंदिगढ येथील मंगतपाल सिंग (२४) या तरुणाने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर ठाण्यात अत्याचार केला. तसेच यावेळी काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित विवाहितेची गेल्या वर्षी त्या तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्यातच त्याने तिला नोकरीचे आमिष दाखवून बोलणी करण्यासाठी ठाण्यात बोलवून बाळकुम येथील हॉटेलमध्ये नेले. दरम्यान, त्याने तिच्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून ते तिला सेवन करण्यासाठी दिले. त्यानंतर, त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची एक व्हिडीओ क्लिप तयार केली.
ती क्लिप तिच्या पतीला दाखवतो तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप त्या पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच हा प्रकार २ आॅक्टोबर २०१७ रोजी घडला असून याप्रकरणी तिने शुक्रवारी रात्री कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अत्याचारासह फसवणूक आदी प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. देशमुख करत आहेत.