हि दोस्ती तुटायची नाय; मित्राने आवाज दिला नसता तर आज मी वाचलो नसतो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 04:21 PM2021-02-01T16:21:39+5:302021-02-01T16:22:55+5:30
Bhiwandi Godown Building Collapse : भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना
नितिन पंडीत
भिवंडी - सख्या नातेसंबंधांपेक्षा सध्या मित्राच्या नात्याला जास्त महत्व तरुणाईकडून देण्यात येत आहे. मित्रा तुझ्यासाठी काय पण म्हणत मित्रासाठी काहीही करण्याच्या तयारी तरुण मित्रांची असते. याच मैत्रीच्या जीवावर एका मित्राचा जीव वाचल्याची घटना भिवंडीतील इमारत दुर्घटने प्रसंगी घडली आहे. कामावर यायला उशीर झाला होता, मात्र गाडी पार्क करून कंपनीत जाणार तोच बाजूला उभा असलेल्या मित्राने आवाज दिला. मित्राने आवाज दिला म्हणून त्याला भेटण्यासाठी अवघी पाच ते दहा सेकंड गेले आणि इमारत कोसळली . मित्राने आवाज दिला नसता तर आज मी वाचलो नसतो अशी भावना या दुर्घटनेत बचावलेल्या कामगाराने व्यक्त केली. दरम्यान दुर्घटनेत कामगाराच्या दुचाकीचा दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
भिवंडीत गोदाम इमारत कोसळली; १ मृत्यू तर ६ जखमी, ढिगाऱ्याखाली ४-५ जण अडकल्याची शक्यता
अखिल भडाना ( वय २४ वर्ष रा.कामतघर - मूळ राहणार हरियाणा ) असे मित्राच्या हाकेने वाचलेल्या कामगाराचे नाव असून तो दुर्घटनाग्रस्त गोदाम इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या शॅडोफॅक्स ऑनलाइन पार्सल कुरियर कंपनीत स्कॅनिंगचे काम करतो. सोमवरी त्याला कामावर यायला उशीर झाला होता , घाई घाईत त्याने कंपनी जवळ दुचाकी गाडी पार्क केली आणि कंपनीत जाणार तोच त्याचा मित्र आशिष याने आवाज दिला. गाडी वरून उतरलो आणि आशिषकडे जाण्यासाठी अवघ्या पाच दहा पावले मागे आलो तोच इमारत कोसळली. मात्र या इमारत दुर्घटनेत माझ्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने माझा जीव वाचला , मित्राने आवाज दिला नासता तर आज मी इथे नसतो, देवाच्या रूपाने मित्रानेच मला वाचवले अशी भावनिक प्रतिक्रिया अखिल भडाना याने दिली आहे. दरम्यान या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले असून जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.