पाणीयोजनेचे काम निकृष्ट झाल्याने पंचायत समितीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:38 PM2019-06-20T23:38:03+5:302019-06-20T23:38:10+5:30
थेट अधिवेशनात जाणार; मुरबाडमधील कळंभे ग्रामस्थांचा इशारा
मुरबाड : पन्नास लाख रुपयांच्या खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुमार दर्जाचे झाल्याने कळंभे ग्रामस्थांनी गुरुवारी मुरबाड पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या मोर्चात गावातील महिला तसेच पुरुष सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांना १५ दिवसांत हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावर सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास कळंभे गावकºयांनी थेट अधिवेशनात धडकणार, असा इशारा दिला.
कायम पाणीटंचाईची झळ सोसणाºया कळंबे गावासाठी आ. किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये ५१ लाख रुपये खर्चाची योजना मिळाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या योजनेतील ठेकेदार आणि अधिकारी यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा गावकºयांचा आरोप आहे. तसेच याच योजनेतून पाणीसाठवण करण्यासाठी बनवण्यात आलेली पाण्याची टाकी ही गळकी असल्याने तसेच पाइप निकृष्ट बसवल्याने काम सुमार दर्जाचे झाल्याचे समोर आले. याचाच जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता. विशेष म्हणजे पंचायत समितीत भाजपची सत्ता असताना पंचायत समिती उपसभापती सीमा घरत, अनिल घरत तसेच सदस्य दीपक पवार, सदस्या सीमा चौधरी आणि सचिन चौधरी यांनी गावकºयांसोबत मोर्चाचे नेतृत्व केले. गटविकास अधिकारी केळसकर यांच्या दालनात या सर्वांसोबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी कारवाईसंबंधी पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी येझरे यांनी मोर्चेकºयांना आश्वासन दिले. येत्या १५ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावू. तसे न झाल्यास संबंधित ठेकेदारावर पोलीस कारवाई करण्याची हमी दिली.