ठाणे तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:22 AM2018-08-08T03:22:41+5:302018-08-08T03:22:44+5:30
सतत वाढणाऱ्या महागाईमुळे मजुरी आणि इतर खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
ठाणे : सतत वाढणाऱ्या महागाईमुळे मजुरी आणि इतर खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. खर्चाच्या तुलनेत शेतीचे उत्पन्न होत नसल्यामुळे ते हवालदिल झाले आहे. या समस्येतून शेतकºयांना बाहेर काढून आर्थिक पाठबळ देण्यासाठी शेतीच्या मशागतीला लागणारा खर्च व मजुरी रोजगार हमीतून द्यावी, आदी मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी व शेतमजुरांनी येथील तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.
जांभळीनाक्यावरील शिवाजी मैदानावर एकत्र आलेल्या या मोर्चेकºयांनी मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेला. यावेळी महिला कार्यकर्त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आढळून आला. प्रवेशद्वारावर अडवण्यात आलेल्या या मोर्चेकºयांमुळे या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली. शेतीतून येणारे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही. या आर्थिक ताळेबंदातून मुक्त होण्यासाठी शेतकरी पारंपरिक शेतीपासून परावृत्त होत आहे. यास वेळीच पायबंद घालण्यासाठी श्रमजीवी कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढून शासनास धारेवर धरले.
शेतकºयांच्या खर्चाचे आर्थिक चित्र बदलवण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमधील सर्व तहसील कार्यालयांवर श्रमजीवींनी एकाच दिवशी मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले. याप्रमाणे येथील तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सरकारकडे मागणी करून रोजगार हमी योजनेत बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत, संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकाºयांसोबत नागपूर येथे अधिवेशनकाळात बैठकही पार पडली. तरीदेखील विलंब होत असल्यामुळे श्रमजीवींनी मोर्चे काढून सरकारने तातडीने शेतीची कामे रोजगार हमीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी लावून धरली. यामुळे शेतकरी सक्षम होऊ शकेल, आदिवासी-दुर्गम भागात शेती करणे परवडेल आणि भुकेचा प्रश्न सुटण्यास हातभार लागेल, असे मोर्चेकºयांच्या मार्गदर्शन प्रसंगी पंडित यांनी स्पष्ट केले.