जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:55 PM2019-12-22T23:55:29+5:302019-12-22T23:55:55+5:30
एकूण २१ जागा : मतदान हक्कासाठी निबंधकांकडून अनेक अटी, ठाणे-पालघरमध्ये जोरदार हालचाली
सुरेश लोखंडे
ठाणे : राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांत जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या बँकेच्या २१ संचालकांसाठी होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी कोकण विभागीय सहनिबंधक जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी जिल्ह्यातील सहकारी संस्थांकडून नुकतीच ठरावांची मागणी केली आहे. यास अनुसरून दोन्ही जिल्ह्यांतील सहकार क्षेत्रात जोरदार मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सभासदांना अनेक अटी निबंधकांनी घालून दिल्या आहेत.
टीडीसीसी बँकेने सुमारे १५३.१० कोटी ढोबळ, तर ३२ कोटी रुपये निव्वळ नफा गेल्या आर्थिक वर्षात बँकेने कमावला आहे. याशिवाय, बँकेचे वसूल भागभांडवल मार्चअखेर ४३.०३ कोटींचे आहे. तर, १०४३.१५ कोटींचा एकूण निधी बँकेकडे आहे. स्वनिधी ९३३.३० कोटी रुपये आणि ठेवी सहा हजार ९७८.१५ कोटींच्या आहेत. बँकेचे कर्ज वितरण तीन हजार १३.२७ कोटींचे आहे. तर, बँकेचे खेळते भांडवल आठ हजार ३१४.३३ कोटींचे आहे. २१ संचालकांच्या या बँकेत सध्या १९ संचालक आहेत. मात्र अशोक पोहेकर आणि कृष्णा घोडा या दोन संचालकांचे निधन झाले. त्यांच्या जागी अन्य संचालकांची निवड झालेली नव्हती.
सत्तेसाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न, बँकेवर सध्या बविआच्या संचालकांची सत्ता
बँकेवर सध्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या संचालकांची सत्ता आहे. बहुजन विकास आघाडीचे राजेंद्र पाटील अध्यक्ष असून भाजपाचे भाऊ कुºहाडे उपाध्यक्ष आहे. मच्छीमार बांधव व शेतकरी राजा आदींच्या यांच्या हितासाठी व सर्वांगीण विकासासाठी असलेल्या या बँकेवर याआधी राष्टÑवादीची सत्ता दीर्घकाळ होती. यामुळे या बँकेवर सर्वाधिक आगरी व कुणबी समाजाचे वर्चस्व दीर्घकाळापासून दिसून येत आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील सहकाराच्या एकजुटीमुळे अजून बँकेचे विभाजन झाले नाही. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर जिल्ह्याची निर्मिती होताच बँकेचे विभाजनही होण्याची दाट शक्यता होती. परंतु, सहकारातील एकजुटीमुळे बँकेचे विभाजन लांबणीवर गेले आहे. या निवडणुकीनंतरही ते कायम राहील, अशी अपेक्षा सहकार क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, यावेळी बँकेवर सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेसह काँगे्रस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी आतापासूनच प्रयत्न करीत आहे.
साडेचार हजार सभासदांना मतदानाचा हक्क : बँकेच्या निवडणुकीची तारीख लवकरच घोषित होईल. तत्पूर्वी १६ जानेवारीपर्यंत सहकारी संस्थांकडून ठराव मागितले आहेत. यासाठी संस्था क्रियाशील असावी आणि पाच वर्षांत एक वेळ तरी वार्षिक सभेला उपस्थितीला असणे अपेक्षित आहे. याशिवाय, एक हजार रुपयांचा एक शेअर असण्याची गरज आहे. बँकेत व्यवहार असणे आवश्यक असून लॉकरचा वापर तरी करणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या निकषास अनुसरून सहकारी संस्थेला या बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. यानुसार, बँकेच्या या निवडणुकीत सुमारे चार ते साडेचार हजार सभासदान्ाां मतदानाचा हक्क मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील सहकार क्षेत्र या निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.