फ्रंटलाइन वर्कर्सची लसीकरण केंद्राकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 02:12 AM2021-02-10T02:12:48+5:302021-02-10T02:13:02+5:30
५,२०० जणांचे करणार लसीकरण : केडीएमसी आयुक्त, पोलीस उपायुक्तांनी घेतली लस
कल्याण : फ्रंटलाईन वर्कर्सने लस घेण्यासाठी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मंगळवारी रुक्मिणीबाई रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले की, फ्रंट लाईनच्या पाच हजार २०० कर्मचारी-अधिकाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
लस उपलब्ध होताच महापालिकेने चार केंद्रांतून सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय यांच्या लसीकरणास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यातील जवळपास ९८ टक्के लसीकरण झालेले आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईनवरील कर्मचारी आणि अधिकारी वर्गासह पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात करण्यात आली.
पाेलीस उपायुक्त पानसरे यांनी सांगितले की, कोरोनाची लस मी घेतली आहे. आमच्या खात्यातील सगळे पोलीस आणि अधिकारी लस घेणार आहेत. सगळ्यांनी स्वत:हून पुढे येऊन लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, आदी उपस्थित होते.