फळे, भाजी, फुले विक्रेत्यांचे वजन-काटे दगडाने ठेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:46 AM2021-08-14T04:46:03+5:302021-08-14T04:46:03+5:30

डोंबिवली : केडीएमसी प्रशासनाला फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा विसर पडला असताना दुसरीकडे आता तुघलकी कारवाई करून फेरीवाल्यांच्या पोटावर मारण्याचे प्रकार सुरू ...

Fruit, vegetable, flower sellers were crushed by the weight-cutting stone | फळे, भाजी, फुले विक्रेत्यांचे वजन-काटे दगडाने ठेचले

फळे, भाजी, फुले विक्रेत्यांचे वजन-काटे दगडाने ठेचले

googlenewsNext

डोंबिवली : केडीएमसी प्रशासनाला फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा विसर पडला असताना दुसरीकडे आता तुघलकी कारवाई करून फेरीवाल्यांच्या पोटावर मारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. डोंबिवली पश्चिमेत झालेल्या कारवाईदरम्यान अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांचे वजन-काटे अक्षरश: दगडाने ठेचून तोडून टाकले. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून मनपा कर्मचाऱ्यांनी दगड वजन-काट्यावर नव्हे तर आमच्या पोटावर घातल्याची संतप्त प्रतिक्रिया फेरीवाल्यांमध्ये उमटत आहे.

फेरीवाल्यांचे अतिक्रमण हा मुद्दा दिवसागणिक वादग्रस्त बनत आहे. फेरीवाल्यांकडून पुनर्वसन करण्याची मागणी वारंवार होत आहे. पुनर्वसनासंदर्भात डोंबिवलीतील ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागांतील जागांची सोडतही काढण्यात आली होती. डोंबिवलीच्या सोडतीनंतर कल्याणमध्ये सोडतीचा कार्यक्रम होणार होता. मात्र पुढील कार्यवाही ठोस अंमलबजावणीअभावी कागदावरच राहिली आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आजतागायत याबाबत कोणतीच हालचाल झाली नाही. एकीकडे पुनर्वसन रखडले असताना दुसरीकडे मनपाची सुरू असलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप फेरीवाला संघटनांचा आहे.

दरम्यान, मनपाच्या डोंबिवली ‘ह’ प्रभागाच्या वतीने नुकत्याच झालेल्या अन्यायकारक कारवाईने फेरीवाल्यांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. मनपाकडून एरव्ही माल जप्त करण्याची कारवाई होते. परंतु, आता तर थेट वजन-काटे लक्ष्य केले जात असल्याने आम्हाला आयुष्यातून उठवण्याचा मनपाचा हेतू आहे का, असेही सवाल फेरीवाल्यांनी केले आहेत. कोरोनामध्ये व्यवसाय बंद असल्याने रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. केंद्र सरकारने आर्थिक मदत केल्याने काहीसा आधार मिळाला. पण मनपाने कारवाई सुरूच ठेवल्याने जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाल्याकडे फेरीवाल्यांनी लक्ष वेधले आहे. मनपा आमच्याकडून व्यवसाय करताना फी वसुली करते आणि दुसरीकडे अन्यायकारक कारवाई करते हा विरोधाभास का, असाही सवाल त्यांचा आहे.

कारवाईचे समर्थन नाही, पण...

कर्मचाऱ्यांकडून झालेल्या कारवाईचे समर्थन नाही, पण वारंवार सांगूनही फेरीवाल्यांनी अतिक्रमण करणे सुरूच ठेवले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

- सुहास गुप्ते, ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी, केडीएमसी

----------------------------------------------------

Web Title: Fruit, vegetable, flower sellers were crushed by the weight-cutting stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.