कार खेचून केला इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:16 AM2018-09-01T04:16:29+5:302018-09-01T04:17:03+5:30
महागाईने जनतेचे कंबरडे मोडलेले असतानाच मंगळवारपासून पुन्हा इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड
ठाणे : महागाईने जनतेचे कंबरडे मोडलेले असतानाच मंगळवारपासून पुन्हा इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी चक्क गाडी ओढून आणि दुचाकीला हातगाडीवर ठेवत पेट्रोलपंपापर्यंत नेऊन मोदी सरकारचा निषेध केला. तसेच पंपावर नागरिकांना काळ्या गुलाबाची प्रतिकृती देत दरवाढीसह भाजपा सरकारचा निषेध केला.
पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असल्याचा आरोप ठाणेराष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी केला. या आंदोलनात विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांनीही सहभाग घेतला होता. गरिबांची चेष्टा बंद करा, पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, मोदी सरकार हाय-हाय, पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, सबंध देशाचा विचार केल्यास राज्यात इंधनावर सर्वाधिक कर आकारले जात आहेत. महागाईने जनता मेटाकुटीला आलेली असतानाही अशी दरवाढ केली जात असल्याने गरिबांना जगावे कसे, असा प्रश्न पडला आहे. आता असे जुलमी सरकार खाली खेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा दिला.