खूनाचा प्रयत्न करुन तीन वर्षापासून फरारी आरोपी अखेर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 04:02 PM2022-01-27T16:02:29+5:302022-01-27T16:04:37+5:30
खूनाचा प्रयत्न करुन गेल्या तीन वर्षांपासून पसार झालेल्या अभिषेक भोसले उर्फ गुड्डू (२९, रा. डोंबीवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: खूनाचा प्रयत्न करुन गेल्या तीन वर्षांपासून पसार झालेल्या अभिषेक भोसले उर्फ गुड्डू (२९, रा. डोंबीवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली. त्याला श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी गुरुवारी दिली.
खून तसेच खूनाचा प्रयत्न अशा विविध गंभीर गुन्हयांमध्ये पाहिजे किंवा फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी पोलिसांना दिले आहेत. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात खूनाचा प्रयत्न तसेच आर्म अॅक्टच्या गुन्हयात अभिषेक भोसले याचा पोलीस शोध घेत होते. याच पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथकाकडूनही भोसलेसह अशाच पाहिजे (वॉन्टेड) आणि फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत होता. तो मुंबई महापालिकेत नोकरी करीत असून मुंबईतील महापालिका कार्यालयात येणार असल्याची टीप खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे आणि संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, हवालदार संदिप भोसले, सुहास म्हात्रे आणि भगवान हिवरे आदींच्या पथकाने अभिषेक याला २५ जानेवारी २०२२ रोजी मुंबईतून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने डोंबिवलीत वास्तव्याला असल्याचे सांगितले सांगून वागळे इस्टेट भागात खूनाचा प्रयत्न केल्याचीही कबूली दिली. त्याला पुढील कार्यवाहीसाठी श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, त्याला १५ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
* अनुकंपा तत्वावर मिळविली नोकरी-
अभिषेक याने अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागी मुंबई महापालिकेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील लेखा शाखेत २०१५ मध्ये शिपाई पदावर नोकरी मिळविली होती. त्यानंतर २०१९ मध्ये वागळे इस्टेटमधील एका गुंडाला शोधताना त्याचा पत्ता न सांगणाऱ्यावर खूनी हल्ला करुन पसार झाला होता. त्यानंतर कोणालाही पत्ता लागू न देता तो महापालिकेत नोकरी करीत असल्याचे आढळल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली.