तीन गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला १३ वर्षानंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 05:02 PM2024-04-26T17:02:25+5:302024-04-26T17:02:39+5:30
मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश.
नालासोपारा (मंगेश कराळे) :- खून, गैंग रेप व जबर मारहाण या वेगवेगळ्या तीन गंभीर गुन्ह्यात फरार आरोपीला तब्बल १३ वर्षांनंतर अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करून पुढील तपास व चौकशीसाठी वालीव पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.
२२ नोव्हेंबर २०१२ मध्ये धानिवबागच्या गांगडीपाडा येथे आरोपींनी चोर समजून एकाला जबर मारहाण करून जीवे ठार मारून त्याची ओळख पटू नये यासाठी नग्न अवस्थेत टाकून दिले होते. वालीव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दुसरी घटना १० सप्टेंबर २०१५ साली २० वर्षाच्या तरुण मुलीला रिक्षात बसवून घाटकोपर नेत असताना रिक्षा चालक व त्याच्या इतर साथीदारांनी जबरदस्तीने नालासोपारा येथे नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी निर्मल पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर तिसऱ्या घटनेत ४ ऑगस्ट २०१२ रोजी धानिवबाग याठिकाणी एकाने स्वतःच्या घरात आरोपीला न विचारता भाडेकरू ठेवल्याच्या कारणावरून आरोपी व इतर साथीदारांनी जबर मारहाण करून त्याचे डोक्यात व पायावर लोखंडी सळईने मारून गंभीर दुखापत केली आहे. वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
वरिष्ठ अधिका-यांनी गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा आदेश दिले होते. या गुन्ह्यातील आरोपी अक्रम खान उर्फ शेख याचा यापूर्वी सर्वोतोपरी शोध घेऊन देखील १३ वर्षांपासून मिळून येत नव्हता. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सपोनि दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, अकील सुतार यांनी सदर गुन्हयाची वालीव पोलीस ठाण्यातून माहीती घेतली. आरोपीचा सखोल तपास करून गोपनीय माहीती प्राप्त करून मागील दोन महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेवून तांत्रिक विश्लेषण करुन तपासात सातत्य ठेवून सापळा लावून आरोपी अक्रम खान उर्फ शेख (३६) याला गुरुवारी ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास केल्यावर ३ गुन्हयात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल राख, पोनि धनंजय पोरे, सपोनि दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक नितीन विचारे, सहाय्यक फौजदार श्रीमंत जेधे, पोहवा मनोहर तावरे, आसिफ मुल्ला, संतोष मदने, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, अकील सुतार, प्रविणराज पवार, राजविर संधू, सतीष जगताप, अनिल नांगरे, राजाराम काळे, महेश वेल्हे, संग्राम गायकवाड, हनुमंत सूर्यवंशी, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मूळे, सचिन चौधरी, सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.