भिवंडीत अवैधरित्या कत्तलखाने सुरू, शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 06:49 PM2017-11-22T18:49:11+5:302017-11-22T18:49:22+5:30
भिवंडी : महापालिकेच्या मार्केट विभागाअंतर्गत शहरातील जनावरांचे कत्तलखाने बंद केल्याने काही लोकांनी कसाई वाड्याजवळ उघड्यावर जनावरे कापणे सुरू केल्याने परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
केंद्र शासनांतर्गत न्यायीक अधिकार असलेली नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल ही संस्था पर्यावरण विषयक काम करते. कत्तलखान्यातून निघणारे रक्त, टाकावू अवशेष व निकामी चीजवस्तुची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे.त्यामुळे नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल या संस्थेतील धर्मपाल या व्यक्तीने राज्यातील कत्तलखान्या विरोधात पुणे खंडपीठाकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने केलेल्या सुनावणीत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने केलेल्या पहाणीत जनावरांचे रक्तांवर प्रक्रीया न करता ते सांडपाण्याबरोबर वाहून दिले जाते.तसेच टाकावू अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या मार्गदर्शक अटी दिलेल्या होत्या त्याची महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने अंमलबजावणी न केल्याने शहरातील सर्व कत्तलखाने मनपाच्या मार्केट विभागाने बंद केले आहेत.असे असताना शहरातील काही ठिकाणी दररोज मोठ्या जनावरांच्या उघड्यावर कत्तली केल्या जात आहेत.तर जनावरांची कत्तल झाल्यानंतर निघालेले रक्त गटारातून वाहून जात आहे. त्यापैकी कसाईवाड्यात ज्या ठिकाणी कत्तली केल्या जात आहेत त्या परिसरांत उर्दु माध्यमांच्या दोन शाळा आहेत. तेव्हा या रस्त्यावरून जाणा-या - येणा-या विद्यार्थ्यांना तेथे बांधलेल्या जनावरांपासून धोका निर्माण झाला आहे. तर या परिसरांत पसरलेल्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बेकायदेशाीरपणे होणारी कत्तल थांबवून पालिकेचे कत्तलखाने सुरू करावेत, अशी मागणी करीत मानवाधिकार फाऊंडेशन व इंडियन युवा मोर्चा यांच्या मार्फत आयुक्त योगेश म्हसे यांना निवेदन दिले.