लग्नाचा दबाव झुगारल्याने स्वप्न पूर्ण- झरीन खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 02:14 AM2021-02-10T02:14:16+5:302021-02-10T02:14:24+5:30
नोकरी करून शिकणार
- कुमार बडदे
मुंब्रा : झरीन खान बारावीची परीक्षा उत्तीर्ण होताच तिच्या घरी तिच्या लग्नाचे पाहायला सुरुवात झाली होती. मात्र आपल्याला लागलीच लग्न करायचे नाही हे तिने आपल्या आई-वडिलांना बजावले. नोकरी करीत तिने सीए (आयपीसीसी) ही देशातील अत्यंत कठीण परीक्षा देशभरात अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण केली. आता तिच्यावर तिचे आई-वडील कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. मुलीचे लग्न करुन मोकळे होण्याची चूक केली नाही हे उत्तम झाले हे त्यांना आता उमजले आहे.
मुस्लिम समाजात मुलींचे लहान वयात लग्न केले जाते. झरीनच्या उच्च शिक्षणातही लग्नाचे विघ्न आले होते. बारावी उत्तीर्ण होताच झरीनचे लग्न करण्याकरिता नातलग, आजूबाजूचे यांचा कुटुंबावरील दबाव वाढू लागला. झरीनचे आई-वडील तिने लग्न करावे याकरिता तिच्या मागे लागले होते. मात्र आपल्याला इतक्यात लग्न करायचे नाही. सीए उत्तीर्ण व्हायचे आहे, असे झरीनने घरच्यांना सांगितले. तिचा हा निर्णय स्वीकारताना घरच्यांना थोडे जीवावर आले. वेळीच मुलीचे लग्न झाले नाही तर समाज काय म्हणेल, याची धास्ती होती. मात्र लहानपणापासून झरीन खूप हुशार आहे हे ठावूक असल्याने तिचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तिला एक संधी देण्याचे घरच्यांनी ठरवले आणि त्या संधीचे तिने सोने केले.
झरीनचे वडील नवी मुंबईत गरेजमध्ये मेकनिकचे काम करतात तर आई गृहीणी आहे. झरीन गणितात अत्यंत हुशार असल्याने तिने सीए व्हावे याकरिता तिच्या भांडुप येथील महाविद्यालयातील काही सिनीयर मित्रमैत्रिणींनी तिला प्रोत्साहन दिले. फरीदाबादच्या विराज अरोरा यांच्या सीए (आयपीसीसी) परीक्षार्थिंकरिता असलेल्या क्लासमध्ये तिने प्रवेश घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन पद्धतीने तिने सीए परीक्षेचा अभ्यास केला. झरीन नोकरी करीत असल्याने तिने आपल्या पगारातून स्मार्ट फोन घेतल्यानेच तिला ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य झाले. देशात अव्वल आल्याने आता अधिक चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, अशी तिची अपेक्षा आहे. सीए अंतिम वर्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही नोकरी करणार असल्याचे तिने सांगितले.
देशातील शिक्षणाची आवड असलेल्या प्रत्येक मुस्लीम मुलीने उच्च शिक्षण घेण्याकरिता आपल्या कुटुंबीयांना राजी केले पाहिजे. लग्न करुन संसारात बसल्यावर मुलींचे शिक्षण थांबते व अनेक हुशार मुलींची प्रगती खुंटते. मुस्लीम समाजातील मुलींच्या पालकांनीही लग्न ही मुलीच्या आयुष्यातील इतिश्री मानू नये.
- झरीन खान, देशात सर्वप्रथम, सीए (आयपीसीसी)